नांदूरा येथील हनुमानाच्या १०५ फुट मूर्तीला जलाभिषेक,माल्यार्पण

0

बुलढाणा– बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे उभ्या १०५ फूट उंचीच्या श्री हनुमान मूर्ती देवस्थानात हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून साडेतीन क्विंटल फुलांचा हार रिमोटने मूर्तीला चढवण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राज्यभरातून हा जन्मोत्सव पाहण्यासाठी भाविक येथे येतात. येथील या भव्य हनुमान मूर्तीमुळे गावाची वेगळी ओळख निर्माण झाली असून २००१ पासून नांदुरा शहराला “हनुमाननगरी” अशी ओळख मिळाली आहे.

जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती असल्याचे बोलले जाते. हनुमान जयंतीनिमित्त नांदुरा येथील जगप्रसिद्ध १०५ फुटी हनुमानाच्या मूर्तीला ३५० किलोचा फुलांचा ५५ हजार रुपये किमतीचा हार स्वयंचलित छोटेखानी वायर रोपवरून चढवण्यात आला. या वेळी उपस्थित पवनसुताच्या भाविकांनी ‘ओम नमो भगवते वायुनंदनाय नम जयघोष केला.अनेक वर्षपासून ३५० किलोचा हार हनुमान जन्मोत्सवाला हनुमान मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे. आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मूर्तिकाराने हनुमानाची ही १०५ फुटी मूर्ती २१० दिवस अथक प्रयत्न करून पूर्णत्वास नेली. आठ नोव्हेंबर २००१ रोजी गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरीचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री १०८ निश्चलानंदजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्ती बनवण्यासाठी ८०० क्विंटल लोखंड, ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आलं. आज दिवसभरात हजारो भाविक नांदुरा हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. तर दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.