देशाचे राष्ट्रपिता एकच आणि ते म्हणजे महात्मा गांधी ! -नाना पटोले संतापले

0

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान गेल्या काही दिवसात भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. या प्रकरणी भाजपा नेत्यांनी अजून माफी मागितलेली नाही. उलट दररोज कोणीतरी महापुरुषांचा अपमान करतच आहे. आज पुन्हा एकदा महापुरुषांचा अपमान केला गेला. महात्मा गांधी हे जुने राष्ट्रपिता आता नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे पण या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी, इतर कुणाची ती पात्रता नाही, असा समाचार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.


प्रसार माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोकांना नवीन भारत हवा आहे, या नव्या भारतात लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून काही मुठभर लोकांच्या हाती सर्व आर्थिक व्यवहार देण्यात आले आहेत पण लोकांना मात्र जुनाच भारत पाहिजे, नवीन भारत नकोच आहे. या नव्या भारतात कोणी स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर त्यांनी ती थोपटून घ्यावी. काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श झाले आता नवीन आदर्श नितीन गडकरी आहेत, असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला होता. आता काही लोकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जुने राष्ट्रपिता झाले नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून अपमान केला. राष्ट्रपिता व महापुरुषांचा अपमान करू नका अशीच आमची विनंती आहे, जे असा प्रयत्न करतील त्यांना जनताच धडा शिकवेल. अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात असा उल्लेख केल्यानंतर नवा वाड सुरू झाला आहे. महापुरुषांचा अपमान करुन त्यांचे मोठेपण कमी होत नाही पण अशा प्रकारचा खोडसाळपणा वेळीच थांबवला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.