
नागपूर हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा आज शुक्रवारी संपला. एकीकडे विरोधकांचा दुसऱ्या दिवशीही कामकाजावर बहिष्कार कायम राहिला दुसरीकडे विधानभवनासमोर महिलेच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाने सभागृहाबाहेर वातावरण तापले. सोमवारी सीमावाद संदर्भात प्रस्ताव सत्ता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सभागृहात मांडणार आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरील निलंबन कारवाईनंतर विरोधक बाहेर पडले ते आज दुसऱ्या दिवशीही सभागृहात आलेच नाहीत. 52 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर झाल्या. विरोधकांच्या बहिष्कारात विधानसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाले मात्र मुक्ता टिळक यांच्या निधना निमित्त शोक प्रस्तावानंतर ते पुढे जाऊ शकले नाही. दुसऱ्या आठवड्यात सीमा वादावरून पुन्हा एकदा विरोधक सरकारची कोंडी करतात की एकत्रितपणे हा प्रस्ताव संमत होतो हे कळणार आहे. याशिवाय गुरुवारी तब्बल पाच तास चाललेली विदर्भ मराठवाडा विकासाची चर्चा आणि या चर्चेला सरकारचे उत्तर काय मिळणार याविषयीची उत्सुकता दुसऱ्या आठवड्यात राहणार आहे.