नदी वाहते आहे काव्य संग्रह प्रकाशित

0

नागपूर(Nagpur) ६ जुलै :- जगण्याविषयीची समज मधुराच्या कथेत आढळतात. तिच्या लिखाणातून तिचा मानवी स्वभावाचा अभ्यास खोलवर असल्याचे दिसून येत. मला कथा लेखनात आशाताई बगे सर्वाधिक भावतात. त्यांच्या कथा सशक्त आहेत. आशाताईनंतर विदर्भाला तशी सशक्त कथालेखक म्हणून मधुरा इंदापवार लाभली आहे, असे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे(Dr. Rabindra Sobhane) यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघ आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुरा इंदापवार यांच्या ‘नदी वाहते आहे’ या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वि. सा. संघाच्या अमेय दालनात आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षपद वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी भूषविले. तर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर, ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहोकर यांच्यासह कथाकार मधुरा इंदापवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

वसंत वाहोकार म्हणाले, हा कथासंग्रह मला सर्वार्थाने आवडला आहे. लिहिणारे लिहितात. पण, लिहिण्याचे गांभीर्य मला या कथांमध्ये आढळले. संग्रहात कथेचा घाट, संवाद, भाषा यांचा चांगला समनवय साधला गेला आहे. या संवादाने मनात घर केल्याचे वाहोकार म्हणाले.

प्रदीप दाते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कथाकार मधुरा इंदापवार यांनी याच सभागृहात झालेल्या कार्यशाळेत कथा लिहिण्याचे बीज रोवल्या गेले असल्याची भावना प्रास्ताविकात व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अदिती देशमुख यांनी केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार शिरीष घाटे यांनी साकारले आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध विधिज्ञ फिरदोस मिर्झा, डॉ. पिनाक दंदे, श्रीपाद अपराजित, विलास मानेकर, वसुधा वैद्य, अनिल गडेकर, पंकज मानिकताला आदी मान्यवर उपस्थित होते.

कथेचे निखळ, आरपार लेखन : सुप्रिया अय्यर
नवीन पिढीचे विषय, त्यांच्या समस्या आज वेगळ्या आहेत. त्यांची भाषा बदललेली आहे. त्यामुळे, आम्हा साहित्यिकांना जुळवून घेण्यास अडचण निर्माण होते, अशी खंत सुप्रिया अय्यर यांनी व्यक्त केली. म्हणून नव्या साहित्यिकांचे साहित्य वाचण्याचे माझे धाडस होत नाही. हे बाजूला ठेऊन मी आज ‘नदी वाहते आहे’ हा कथासंग्रह वाचला, तो खरोखरच चांगला आहे. पात्रांची उकल लेखिकेने अतिशय सुंदर केली आहे. तिचे लेखन निखळ आणि आरपार आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.