संघर्ष संपलेला नाही

0

 

येत्या २२ जानेवारीला आमचा रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. भारतातील आणि भारताबाहेरील असंख्य हिंदू कुटुंबाच्या श्रद्धा, आशा, अपेक्षा आणि स्वप्नपूर्तीचा सोहळा याची देही याची डोळा बघण्याचे पुण्य ह्या पिढीला मिळते आहे, खरंच ही पिढी अतिशय भाग्यवान आहे.

मागील गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या अनेक पिढ्यांना श्रद्धापूर्तीसाठी लढावे लागलेले आहे, अनेकांना प्राणही गमवावे लागलेले आहे. हा लढा केवळ अन्य धर्मियांशी नव्हता तर आमच्याच धर्मातील क्षुद्र आणि स्वार्थी, विवेकशून्य विचारशक्तीशीही होता. आमच्या श्रद्धेला तडा पाडण्यासाठी अनेक पाताळयंत्री माणसे, समाज, पक्ष आणि संघटनांनी अनेक अस्त्रांचा वेळोवेळी वापर केला. अगदी आमच्या धर्म आणि भावनांचा उपमर्द करून त्यांचे समाधान नाही झाले तेव्हा खोट्या कारणांना आणि धारणांना समोर करताना ह्या निर्लज्जांनी अगदी कायद्याच्या आधारानेही रामजन्म आणि मंदिरभूमी ही अघटीत घटना हे सिद्ध करण्यासाठी दाम, दंड आणि भेद ह्याचाही अनेक वर्षे उपयोग केला.

हे सारं बघत बघत मागची पिढी संपण्याच्या मार्गावर आली परंतु तिने आपला संयम सोडला नाही आणि ध्येयवेडही. अनेक देह धारातिर्थी पडले, अनेक जखमी झाले आणि अनेक कुटुंबे थकलीत आणि निराशेच्या सायंप्रकाशातील एका प्रकाशकिरणाने नवी उर्मी जागवली, वातावरण बदलले, अनिश्चितता संपून नवचेतना जागृत होत श्रद्धापूर्तीचे साकार होण्याचा योग आला. कायद्याने राम जन्मभूमी आम्हा श्रद्धावान हिंदूचीच असल्याचा निर्णय झाला, सारेच श्रद्धावान सुखावले, स्वप्नपूर्तीचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर पसरला.

आम्ही श्रद्धावान आपल्या प्रत्येकाच्या कुवतीनुसार रामललाच्या नवीन वास्तू उभारणीच्या कार्यात तन, मन, धनासोबतच श्रद्धापूर्ण अत:करणालाही झोकून देण्यासाठी सिद्ध झालोत. आता येत्या २२ जानेवारीला आमचा रामलला त्याच्या नूतन मंदिरात स्थापित होणार आहे, आम्हा समस्त हिंदूजनांचं स्वप्न साकार होणार आहे.

हे स्वप्न साकार होताना त्या स्वप्नपूर्तीच्या सोहळ्याकरीता अनेकांना आमंत्रणे गेलेली आहेत आणि जात आहेत. अनेकांच्या घरी आपल्या घरातूनच रामलाला श्रद्धाक्षता वाहण्याकरीता वाटल्या जात आहेत. आमच्यासारखे सामान्य श्रद्ध आपल्या घरी बसून ह्या सोहोळ्याचा आनंद घेणार आहोत. परंतु ज्या अतिथींना सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित होण्यासाठी आमंत्रणे गेलेली आहेत त्यापैकी काहींनी केवळ राजकीय स्वार्थामुळे, अहंकारी वृत्तीमुळे आणि अविवेकी विचारामुळे ह्या सोहळ्याला उपस्थीत न राहण्याचा दुर्दैवी निर्णय घेत असल्याच्या बातम्या येत आहेत.

आपल्याच राष्ट्रातील, आपल्याच धर्मातील आणि आपल्याच परमश्रद्धेय पराक्रमी पुरुषोत्तमाच्या सोहळ्याला आपणच उपस्थित न राहणे हा त्या पुरुषोत्तमाचा, राष्ट्राचा आणि तमाम श्रद्धावानांच्या श्रद्धेचाही जाणूनबुजून अपमान करीत आहे.

हा सर्व राजकाणाचा भाग आहे असं आपणा सर्वांना सामान्यत: वाटत असेल. परंतु हे इतकं सामान्य आणि सोपं नाही असं मला वाटतं. कारण ह्यामागे विविध हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी आणि विचारविरोधी शक्ती कार्यरत असावी ही शंका यावी अशी अनेक वक्तव्ये आपल्या कानावर यायला लागलेली आहेत. ही वक्तव्ये राजकीय विचारांनी प्रेरीत नक्कीच नाहीत तर ती आपल्यासारख्या श्रद्धावान जनसामान्याच्यांमध्ये फूट पडावी ह्यासाठीच केली जात आहेत हे आपण समजून घेतले पाहीजे. आपण सारे जरी पक्षीय विचारांनी वेगवेगळे असलो तरीही आपल्या सर्वांच्या मनात आणि श्रद्धेमध्ये रामाचाच वास आहे एवढे मात्र खरं.

राम मंदिराच्या पुर्णत्वानंतर ही विरोधी विचारशक्ती परत उफाळून येणार आहे, अनेक राष्ट्रविरोधी कारवाया सुरु होणार आहे, अयोध्येत पुढील काही काळात भव्य मस्जिद आकाराला येणं हा योगायोग नाही, ही त्यांच्याअस्वस्थ मनाची भडास आहे हे आपल्याला कळायला हवे. त्यामुळे पुढल्या काळात आपला संघर्ष संपलेला नाही हे आपल्या लक्षात येईल. महत्वाचं म्हणजे आपल्या हिंदुंची अनेक श्रद्धास्थाने अजूनही इतर धर्मियांकडून अतिक्रमीत आहेत आणि ही सारी श्रद्धास्थानं परधर्मियांच्या अतिक्रमातून सोडवायची आहेत, अर्थात भारतीय कायद्याच्याच चौकटीत राहूनच. त्यामुळेच सांगतो की आपला संघर्ष अजूनही संपलेला नाही हे लक्षात घ्या आणि पुन्हा लढायला सज्ज व्हा.

मधुसूदन (मदन) पुराणिक