
आज भी याद है ऋतंबरा की गर्जना
कहो गर्व से हम हिन्दू है हिन्दुस्थान हमारा है !
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 5 |
अमरावतीचे भव्य सायंस्कोअर मैदानावरचे गर्दीचे सर्व विक्रम मोडल्या गेले ते श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील अग्रणी आणि ओजस्वी वाणीच्या वक्त्या साध्वी ऋतंबरा देवींच्या जाहीर सभेने !
श्रीरामजन्मभूमी आंदोलनात साध्वी ऋतंबरा देवी नावाचा एक झंजावात होता. *त्यावेळी पेन ड्राईव्ह नव्हता. ऑडिओ कॅसेट्सचा जमाना होता. पण अल्पावधीत सर्वाधिक कोणाच्या कॅसेट्स विकल्या गेल्या असतील तर त्या ऋतंबरा देवींच्या भाषणाच्या.* त्यांच्या भाषणांनी सर्वत्र वेड लावले होते. अनेक मठ मंदिरांमध्ये त्या कॅसेट्स वारंवार लावल्या जायच्या. त्यांची ओघवती शैली वैचारिक विरोधकांनाही त्यांची भाषणे ऐकायला प्रवृत्त करीत होती. त्या काळात एका मोठ्या काँग्रेस नेत्याचा मुलगा माझा मित्र होता. त्याने आपल्या वडिलांना ऐकायच्या आहेत म्हणून माझ्याजवळून सर्व कॅसेट्स नेल्या होत्या. बिचाऱ्यांना मोठ्या आवाजात ऐकण्याची सोय नव्हती !
साध्वी ऋतंबरा देवी आपल्या भाषणातून बेगडी धर्मनिरपेक्षतेवर कडाडून हल्ला चढवायच्या. आपली गौरवशाली हिंदू परंपरेची मांडणी करून त्या श्रीरामजन्मभूमी विरोधकांवर प्रखर प्रहार करायच्या. तरुण, सात्विक व लोभस व्यक्तिमत्व, आवाजाला विलक्षण धार आणि अमोघ वक्तृत्वाच्या आधारावर त्या केवळ सभा जिंकायच्याच नव्हे तर समाजामध्ये परिणामकारक बदल घडवून आणायच्या.
मला आजही साध्वी ऋतंबरा देवी यांच्या भाषणात नेहमी ऐकलेल्या ओळी आठवतात. ‘वीर शिव प्रताप का गुंज उठा नारा है, कहो गर्व से हम हिन्दू है हिन्दुस्थान हमारा है !’
यातील शेवटचे ‘कहो गर्व से हम हिन्दू है हिन्दुस्थान हमारा है !’ हे वाक्य सभेला उपस्थित असलेले हजारो लोक दोन्ही हात वर करून म्हणायचे तेव्हा अंगावर रोमांच उभे व्हायचे.
*राम, गंगा और कृष्ण का जो विरोधी, जो हमसे टकराएगा वो कुत्ते की मौत यहाँ पर मारा जायेगा ।*
*अरे दुश्मनोंको माँ दुर्गा के बेटो ने ललकारा है, कहो गर्व से हम हिन्दू है हिन्दुस्थान हमारा है !*
*और महाकाल बन कर हम दुश्मन से टकरायेंगे, जहा बनी थी बाबरी मस्जिद अपना मंदिर वही बनायेगे ।*
*और काशी मथुरा वृन्दावन ने एक साथ हुंकारा है गर्व से कहो हम हिन्दू है हिन्दुस्थान हमारा है !*
आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून त्या राष्ट्राचा अभिमान देखील जागवायच्या. धर्मरक्षक श्रीरामचंद्रा
च्या जीवनातील प्रेरक प्रसंगांची मांडणी करून त्या सर्व हिंदूंनी आपापले जाती, पंथ, संप्रदाय, पूजा पद्धती, खानपान, चालीरीती असे सर्व प्रकारचे भेद संपवून एकत्र येण्याचे आवाहन त्या पोटतिडकीने करायच्या.
अमरावतीच्या त्यांच्या सभेचे संचालन करण्याची जबाबदारी संघटनेने माझ्यावर सोपवली होती. बजरंग दलाचा जिल्हा संयोजक म्हणून मी कार्यरत होतो. परिणामी त्यांच्याशी तेव्हा संवाद साधण्याची संधी पण मिळाली होती. भगवे वस्त्र धारण केलेल्या एका साध्वीचे केस ‘बॉय कट’ का आहेत, हा प्रश्न काहींनी कुजकट पणे केला होता म्हणून त्यांना थेट तसे विचारले. अमरावतीच्या किंवा विदर्भाच्या दौऱ्यापूर्वी त्यांना अटक होणार होती. पोलिसांचा गराडा चुकवण्यासाठी त्यांनी वेशांतर केले व त्यासाठी त्यांना आपले लांबसडक केस कापावे लागले असल्याचे कळले. *त्यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी त्यांना इंदौर येथे सभेपुर्वी अटक केली होती. एखाद्या कुख्यात गुन्हेगाराला देतात तशी वागणूक देण्यात आली होती. कोणालाही अटक केल्यानंतर पोलीस त्याला चोवीस तासात न्यायालया समक्ष उपस्थित करतात. पण दिग्विजय सिंह यांनी सूडाच्या भावनेने त्यांना पाच दिवस कोठडीत डांबून ठेवले होते. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना छळण्याचा फटका साध्वी ऋतंबरा देवी यांनाही सहन करावा लागला होता.
ऋतंबरा देवी या महामंडलेश्वर स्वामी परमानंद यांच्या शिष्या आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून त्या अध्यात्मिक क्षेत्राकडे वळल्या होत्या. श्रीरामजन्मभूमी न्यासाचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. राम विलास वेदांती यांच्या संपर्कातून त्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनाशी जोडल्या गेल्या. अशोकजी सिंहल, आचार्य गिरीराज किशोर आणि परमहंस रामचंद्रदास यांचा साध्वी ऋतंबरा यांना स्नेह मिळाला आणि त्यांची योग्यता पाहून त्यांच्यावर जनजागरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. काल पर्वा मला साध्वी ऋतंबरा यांचे ताजे विधान ऐकायला मिळाले. रामकार्यात आपला वाटा केवळ खारीचा होता, हे त्यांचे विधान त्यांच्यातील नम्रता दर्शवणारे आहे. वर्तमानात त्यांनी अनाथ, निराधार महिला, बाल यांच्यासाठी वात्सल्यग्रामची निर्मिती करून मोठे सेवा कार्य उभे केले आहे. देशातील साधू संत त्यांना ‘दीदी माँ’ म्हणून संबोधतात.
बाबरी ढाचा ध्वस्त करण्याच्या प्रकरणी गठीत लिब्रहान आयोगाच्या अहवालात साध्वी ऋतंबरा देवी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता. कारसेवकांनी बाबरी ढाचा ध्वस्त केला तेव्हा ऋतंबरा देवी श्रीराम घोषात तल्लीन होत्या. त्या उन्मुक्तपणे नाचत जनसमुदायाला प्रेरित करीत होत्या. आजही श्रीरामजन्मभूमी आंदोलन आठवले की प्राधान्यक्रमाने साध्वी ऋतंबरा देवी आठवतात.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827