म.रा.जोशी, आशा पांडेंचा साहित्य पुरस्काराने गौरव

0

नागपूर : विदर्भ साहित्‍य संघाचा {Vidarbha Literary Association} 100 वर्षांचा इतिहास देदीप्‍यमान असून अनेक प्रतिभावंत व्‍यक्‍तींनी आपल्‍या प्रतिभेने संस्‍थेचा गौरव वाढवला व मानाचे स्‍थान निर्माण करून दिले. या संस्‍थेने शतकी वाटचालीत नव्‍या पिढीला प्रेरणा आणि व्‍हीजन देण्‍याचे काम केले, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ साहित्य संघाचा ‘शतकोत्तरी प्रथम वर्धापनदिन सोहळा’ रविवारी ‘रंगशारदा’ सभागृहात थाटात पार पडला. या समारंभात ज्येष्ठ साहित्य संशोधक डॉ. म. रा. जोशी यांना “साहित्य वाचस्पती” ही सर्वोच्च मानद उपाधी, ज्येष्ठ लेखिका आशा पांडे यांना साहित्य सेवा गौरव पुरस्कार यासह विविध वाड्मय पुरस्कार देखील प्रदान करण्‍यात आले.
समारंभाला प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर ज्‍येष्‍ठ साह‍ित्‍य‍िक व अभ्‍यासक डॉ. अक्षयकुमार काळे, अमळनेरच्‍या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, वि. सा. संघाचे विश्वस्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. म. रा. जोशी, आशा पांडे, सरचिटणीस विलास मानेकर, राजेंद्र डोळके, वि. सा. संघाच्‍या यवतमाळ शाखेचे उपाध्‍यक्ष रमाकांत कोलते यांची मंचावर उपस्थिती होते. यावेळी ‘विदर्भ साहित्‍य संघाचा 100 वर्षांचा इतिहास’ हा ग्रंथ मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशित करण्‍यात आला. ग्रंथाचे लेखक डॉ. विलास च‍िंतामण देशपांडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. नितीन गडकरी म्‍हणाले, वि. सा. संघाच्‍या अनेक शाखा विविध ठिकाणी आहेत. पूर्वी, या शाखातर्फे गावा-गावांमध्‍ये विविध कार्यक्रम आयोजित केले जात असत. त्‍यातून प्रबोधन, प्रशिक्षण, संस्‍कारांची चर्चा होत असे. समाजासाठी हे उत्‍तम साहित्यिक, सांस्‍कृतिक व्‍यासपीठ होते. वर्तमानादेखील या संस्‍थेने शाळा, महाव‍िद्यालयातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये मराठी साहित्‍य, संस्‍कृतीच्‍या प्रचार व प्रसार करावा व चांगले नेतृत्‍व, व्‍यक्तिमत्‍व घडवावे.
वि. सा. संघाचे माजी अध्‍यक्ष स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या कार्याचा गौरव करताना वक्‍तादशसहस्‍त्रेषू राम शेवाळकर यांचाही त्‍यांनी उल्‍लेख केला. आशा पांडे व डॉ. म. रा. जोशी यांच्‍या साह‍ित्यिक प्रवासाचेही त्‍यांनी कौतुक केले. विदर्भ साहित्‍य संघाचे ही साहित्यिक चळवळ लोकाभिमुख करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.
श्रेष्‍ठ लेखक पैसा, प्रसिद्धी, कीर्तीसाठी लिहि‍त नाही तर त्‍याला लिहिल्‍याशिवाय राहवत नाही म्‍हणून तो लिहितो. अंतर्मुख होऊन बहिर्मुख होताना समाजातील आघात, वेदनांच्‍या साक्षात्‍कार जो लेखन करतो तो श्रेष्‍ठ साहित्यिक असतो. नवोदित लेखकांनी आपण कशासाठी लिहितो याचा विचार करावा आणि प्रगल्‍भ, डोळस साहित्‍यदृष्‍टी असली तरच लेखन करावे, असे डॉ. अक्षयकुमार काळे म्‍हणाले.
अध्‍यक्षीय समारोप करताना प्रदीप दाते यांनी पुरस्‍कार प्राप्‍त साहित्यिकांचे अभिनंदन केले. सत्‍काराला उत्‍तर देताना डॉ. म. रा. जोशी यांनी मराठी भाषेचे अनेक प्रश्‍न असून ते डोळसपणे हाताळले पाहिजे, असा विचार व्‍यक्‍त केला. राजेश जोशी यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रकाश एदलाबादकर यांनी मानपत्र वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक अलोणी व वृषाली देशपांडे यांनी केले तर प्रास्‍ताविक प्रा. राजेंद्र डोळके यांनी केले. राधा ठेंगडीने पसायदान सादर केले.
………
पुरस्‍कार विजेते …
• “साहित्य वाचस्पती” ही सर्वोच्च मानद उपाधी – ज्येष्ठ साहित्य संशोधक डॉ. म. रा. जोशी
• साहित्य सेवा गौरव पुरस्कार – ज्येष्ठ लेखिका आशा पांडे
• राज्‍यस्‍तरीय विदर्भ साहित्‍य संघ अनुवाद पुरस्‍कार – स्मिता लिमये यांच्‍या ‘चेर्नोबिलची प्रार्थना’ ला
• राज्‍यस्‍तरीय आशा सावदेकर स्‍मृती साहित्‍य समीक्षा पुरस्‍कार – मनीषा खैरे यांच्‍या ‘राजारामशास्‍त्री भागवत यांचा भाषा विचार’ ला
• राज्‍यस्‍तरीय कविवर्य श्रीधर शनवारे स्‍मृती पुरस्‍कार – राजीव जोशी यांच्‍या ‘शतकोत्‍तरी ओरखडा’ ला
• ज्येष्ठ साहित्यिक पु. य. देशपांडे स्‍मृती कादंबरी पुरस्‍कार – नरेंद्र शेलार यांच्‍या ‘महाकारुणिक’ ला अण्‍णासाहेब खापर्डे स्‍मृती आत्‍मकथन पुरस्‍कार – प्रमोद नारायणे यांच्‍या ‘मी पॉझिटीव्‍ह आलो’ ला कुसुमानिल स्‍मृती समीक्षा पुरस्‍कार – डॉ. म‍िल‍िंद चोपकर यांच्‍या ‘मराठी वनसाह‍ित्‍य : आस्‍वादाची अक्षरे’ ला
• शरच्‍चंद्र मुक्तिबोध स्‍मृती कविता लेखन पुरस्‍कार – बबन सराडकर यांच्‍या ‘आवर सावर’ ला
• वा. कृ. चोरघडे स्‍मृती कथा लेखन पुरस्‍कार – डॉ. रमा गोळवलकर यांच्‍या ‘खर्जूरवाहिका’ ला
• य. खु. देशपांडे स्‍मृती शास्‍त्रीय लेखन पुरस्‍कार – म‍िल‍िंद कीर्ती यांच्‍या ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्‍ता – कृत्रिम बुद्धीमत्‍तेचे मायाजाल युग’ ला
• संत गाडगेबाबा स्‍मृती प्रवासवर्णन लेखन पुरस्‍कार – संजय वासुदेव कठाळे यांच्‍या ‘अगं नर्मदे’ ला
• वा. ना. देशपांडे स्‍मृती ललित लेखन पुरस्‍कार – प्रफुल्‍ल उदयन सावरकर यांच्‍या ‘निसर्ग संवाद – अनुभव जंगलातले’ ला
• मा. गो. देशमुख स्‍मृती संत साहित्‍य लेखन पुरस्‍कार – डॉ. ग‍िरीश सपाटे यांच्‍या ‘भागवत धर्मातील अलक्ष‍ित संत कवी’ व डॉ. माया पराते – रंभाळे यांच्‍या ‘संत कवय‍ित्रींची भाव कव‍िता’ यांना विभागून
• नाना जोग स्‍मृती नाट्यलेखन पुरस्‍कार – प्रमोद भुसारी यांच्‍या ‘भोवरा’ व आनंद भीमटे यांच्‍या ‘गद्दार’ या नाट्यकृतींना विभागून
• बा. रा. मोडक स्‍मृती बालसाह‍ित्‍य लेखन पुरस्‍कार – शंकर क-हाडे यांच्‍या ‘अब्राहम लिंकन’ ला
• डॉ. वा. वि. म‍िराशी स्‍मृती वैचारिक वाडमय पुरस्‍कार – प्रमोद वडनेरकर यांच्‍या ‘महासत्‍तेच्‍या स्‍पर्धेत चीन’ ला
• के.ज. पुरोह‍ित पुरस्‍कृत ‘शांताराम’ कथा पुरस्‍कार – ‘बकुळ डंख (अक्षरलिपी दिवाळी अंक 2023)’ या डॉ. ऐश्‍वर्या रेवडकर यांच्‍या कथेला
• कविवर्य ग्रेस ‘युगवाणी’तील सर्वोत्‍कृष्‍ट लेखनासाठीचा पुरस्‍कार – दिनकर बेडेकर यांच्‍या ‘जी. एं. च्‍या कथेतील रंगभान आणि दृष्‍यभान’ ला
• नवोदित साह‍ित्‍य लेखन पुरस्‍कार – वैभव भिवरकर यांच्‍या ‘करुणेचे कॉपीराईट्स’ व पल्‍लवी पंड‍ित यांच्‍या ‘सफरनामा – निवडक कलाकारांचा’ या साहित्‍याकृतींना
• स्‍व. हरिकिशन अग्रवाल स्‍मृती पुरस्‍कार – दैनिक सकाळ पत्रकार केतन पळसकर
• विदर्भ साहित्‍य संघाचा शतकोत्‍तर विशेष पुरस्‍कार – योगगुरू राम खांडवे व डॉ. अनिरूद्ध गुर्जलवार यांच्‍या ‘योगोपचार’ या ग्रंथाला
• राजन लाखे पुरस्‍कृत सर्वोत्कृष्‍ट शाखा पुरस्‍कार – विदर्भ साहित्‍य संघाची यवतमाळ शाखा

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live