दिव्यांग प्रमाणवत्र निघाले बनावट : शिक्षिकेसह चौघांवर गुन्हा दाखल
यवतमाळ. संस्कारक्षम पिढी घडविण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांची आहे. म्हणूनच शिक्षकी पेशाला पवित्र मानले गेले आहे. समाजात त्यांना सर्वत्र सन्मानही मिळतो. पण, एका शिक्षिकेने खोटा बनाव करीत वर्षानुवर्षे सर्वांची फसवणूक केल्याचे (teacher cheated by forgery ) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बनावट आधार कार्ड तयार करून या शिक्षिकेने त्या आधारेच दिव्यंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र (False certificate of disability ) मिळविले. याच प्रमाणपत्राच्या आधारे २०९९ मध्ये पांढरकवडा नगरपरिषदेत (Pandharakawda Municipal Council ) शिक्षिका म्हणून नोकरीही मिळविली. १३ वर्षांनी शिक्षिकेच्या या बनावाचे बिंग फुटले. वाशिम पोलिसांनी शिक्षिकेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सोनल प्रकाश गावंडे रा. मंगलमूर्तीनगर, वडगाव, यवतमाळ असे बोगस शिक्षिकेचे नाव आहे. तिने २००९ मध्ये दिव्यांगाचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले. यात तिला नगरपरिषद शिक्षण विभागातील कर्मचारी अतुल वानखडे रा. चापमनवाडी यवतमाळ, राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा पांढरकवडा येथील शिक्षक नहूष ज्ञानेश्वर दरवेशवार रा. सत्यनारायण ले-आउट वडगाव यवतमाळ यांनी मदत केली.
उपसरपंचाची तक्रार
खोट्या प्रमाणवत्राच्या आधारावर सोनल गावंडे नगरपरिषद शाळा पांढरकवडा येथे रुजू झाल्या झाल्या होत्या. हा गंभीर प्रकार उपसरपंच मयूर सदानंद मेश्राम रा. हिवरा बु. ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांच्या तक्रारीनंतर उघड झाला. शिक्षण विभागाने मयूर मेश्राम यांच्या तक्रारीची दखल घेऊन फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २ सप्टेंबर २०२२ रोजी सोनल गावंडे यांनी अपंग युडीआयडी ऑनलाइन अर्ज दाखल केला. त्यासोबत बोगस अपंग प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवासी दाखले जोडले. रुग्णालयामार्फत या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता सर्व कागदपत्रे खोटे आढळून आले. वाशिम जिल्हा रुग्णालयाने याची तत्काळ माहिती वाशिम शहर पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षिकेसह इतरांवर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.
फेरपडताळणीतून वास्तव बाहेर
शिक्षण विभागात बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून बदलीमध्ये सवलत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागात काही वर्षांपूर्वी हा प्रकार उघड झाला. आता तर चक्क बाहेर जिल्ह्यातील रहिवासी दाखवून अपंग प्रमाणपत्र काढण्यात आले. त्या आधारावर नगरपरिषद शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळविली. यावरून संगनमताने शासकीय नोकरीत येण्यासाठी मोठा गुन्हा होत असल्याचेही सिद्ध झाले आहे.