मुंबई : पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आलेला फौजदार सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्याचा अधिकार हा पोलिस आयुक्तांचा होता. त्यांच्याच माध्यमातून तो पुन्हा पोलिस दलात रुजू झाला. राज्यात हजारो फौजदार आहेत. त्यामुळे कोणता अधिकारी कोणाला नोकरीवर घेतो, याची माहिती गृहमंत्र्यांकडे नसते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी केला आहे. सचिन वाझेबद्धल तक्रारी आल्यानंतर आपण तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी त्याच्याबद्दलच्या तक्रारी खोट्या असल्याचे सांगत वाझे याचे पूर्णपणे समर्थन केले होते, असेही अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
देशमुख म्हणाले की, सचिन वाझेला बडतर्फ केल्यावर आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आल्यानंतरच त्यांनी माझ्यावर 100 कोटींचे आरोप केले. त्यांना आरोप करायचेच होते तर त्यांनी नोकरीत असतानाच करायला हवे होते. पण त्यांनी नोकरी गमावल्यानंतर आरोप केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापुढे ठेवण्यात आलेला बॉम्ब सचिन वाझे याने ठेवल्याची कल्पना आम्हाला प्रकरण एनआयए कडे जाण्यापूर्वी आली होती. आयुक्तालयाचे काही अधिकारी त्यात गुंतलेले होते. त्यामुळे याबद्दलची माहिती पोलिस आयुक्तांना नसावी काय, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.