चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपदाची परंपरा कायम राहणार

0

आमदार किशोर जोरगेवार यांना विश्वास

नागपूर (Nagpur) | चंद्रपूर जिल्ह्याला आजपर्यंत नेहमीच मंत्रीपद मिळाले असून पुढील काळातही ही परंपरा कायम राहील, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

आज नव्या आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना जोरगेवर म्हणाले की, “लोकप्रतिनिधी म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी जनतेची सेवा केली, त्याचे फळ म्हणून मला विधानसभेत निवडून दिले. आजपासून माझ्या नवीन कारकिर्दीची सुरुवात होत आहे.”

– विदर्भाच्या विकासासाठी फडणवीसांचे विशेष योगदान

जोरगेवर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना या भागाविषयी विशेष प्रेम आहे. विदर्भाच्या विकासाचा मार्ग फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे निश्चितपणे पुढे जाणार आहे. मोठ्या बहुमताने स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. हे अधिवेशन केवळ शपथविधीपुरते मर्यादित असले तरी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल.”

– ईव्हीएम वादावर जोरदार टीका

ईव्हीएमविरोधी वक्तव्यांवर बोलताना जोरगेवर म्हणाले, “लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु काँग्रेस पक्षाकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ते फक्त टीका करत राहतात. काँग्रेस फक्त ईव्हीएमवर दोष देत बसते.”