
वायसीसीईमध्ये ‘अॅक्ट-2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नागपूर (NAGPUR) : जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात निरनिराळा डेटा बेस सातत्याने तयार होत असतो. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या काळात डेटाचे महत्त्व अधिक असल्याने आणि सहज व योग्य वेळी उपलब्ध होणारा डेटा म्हणजे सिंथेटिक डेटा असून त्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलांजन डे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रूबी ज्युबिली वर्षानिमित्त कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग, तसेच संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग यासोबतच इन्स्टिट्यूट ऑफ डॉक्टर्स, इंजिनिअर्स अँड सायंटिस्ट (आयडीइएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅडव्हान्स इन कम्युटिंग अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ या विषयावर ‘अॅक्ट-2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या द्विदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. निलांजन डे, उद्घाटक सीएसआयआरचे मुकेश पुंड, प्राचार्य डॉ. यु.पी. वाघे, तांत्रिक संचालक डॉ. मनाली क्षीरसागर, संयोजक डॉ. ललित दमाहे, डॉ. कविता सिंग, डॉ. एन व्ही ठाकूर, संयोजन सचिव डॉ. राखी वाजगी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. निलांजन डे यांनी, जगात मोठ्या प्रमाणात डेटा निर्मिती होते; पण त्यातील 90 टक्के डेटा कुणी उघडून देखील पहात नाही. तो फक्त संगणकीय प्रदूषणात वाढ करतो. त्यामुळे डेटा तयार करताना मशीन लर्निंग, मशीन प्लॅनिंग यासाठी उपयुक्त डेटा तयार करावा. त्यापूर्वी तो कसा उपयुक्त ठरेल याचा विचार करावा आणि काळाची गरज म्हणून मशीन लर्निंग ऐवजी मशीन अनलर्निंगचा विचार करावा, असे आवाहन केले.
यानंतर मुकुंद पुंड यांनी, भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आघाडी घेतली आहे. तो सातत्याने वाढतो आहे. तंत्राच्या माध्यमातून शासन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते. त्या आधारे धोरण निर्मिती व निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात डेटा प्रॉडक्शनची गरज अधिक असल्याचे मत व्यक्त केले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. यु.पी. वाघे यांनी स्वागतपर भाषणात वायसीसीईच्या रूबी ज्युबिलीनिमित्त आयोजित या परिषदेत होणार्या परिचर्चेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगितले.
परिषदेची संकल्पना व्यक्त करताना संयोजिका डॉ. मनाली क्षीरसागर यांनी ‘अॅक्ट-2025’ या परिषदेत संशोधन, विकास व नव्या तंत्राचा शोध या विषयांवर चर्चा होऊन आगामी काळात निर्माण होणार्या संधींबाबत शोधकार्य शक्य असल्याचे सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकातून डॉ. कविता सिंग यांनी, देशभरातून 247 संशोधन पेपर परिषदेसाठी प्राप्त झाले असून त्यात विविध प्रतिष्ठित संस्थांच्या प्रतिनिधींनी अभ्यासपूर्ण पद्धतीने सायन्स, इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी यांचा यात सुरेख संगम असल्याचे स्पष्ट केले. उद्घाटन सत्राच्या अंतिम सत्रात प्राचार्य डॉ. वाघे यांच्या हस्ते पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन डॉ. गौरी धोपावकर यांनी, तर आभारप्रदर्शन संयोजक डॉ. ललित दमाहे यांनी केले.