Rahul Gandhi : ईव्हीएमला विरोध करणाऱ्या मारकडवाडीला जाणार

0

मतदान यंत्राच्या विरोधात ‘लाँगमार्च’

विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसने ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार उत्तम जानकर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्यात येणार होते. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय शंभरावर ग्रामस्थांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ईव्हीएमविरोधातील हे आंदोलन आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी हाती घेणार आहे. याबाबत जानकरांनी प्रसारमाध्यमांसमोर यावर भाष्य केलं. पाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनी देखील एक्सवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणाऱ्या ईव्हीएमविरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल. संपूर्ण राज्यात ‘मारकडवाडी पॅटर्न’ राबवायला सुरुवात होईल. शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत. राहुल गांधी(Rahul Gandhi)देखील ईव्हीएमविरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत, असं आव्हाड म्हणाले.

लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार होवो, असंही आव्हाड म्हणाले. राज्यभरातून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त होऊ लागला आहे. 64 वर्षांच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य महायुतीला मिळालं आहे. त्यामुळं निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. विरोधकांनी देखील ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदानाला विरोध केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी देखील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता.

गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याचं ठरवलं होतं. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी 3 डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नियोजन केलं होतं. प्रशासनाने हे मतदान होऊ दिलं नाही. मारकडवाडीत संचारबंदी लागू केली. काहीही झालं तरी मतपत्रिकेवर मतदान घेणार अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाने गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार म्हणाले की, गावात 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गावात केवळ 400 घरं आहेत. त्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पवार म्हणाले.

मारकडवाडीनंतर अकोला जिल्ह्यातही असा प्रयत्न झाला. मात्र तो प्रयत्न फसला. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील दोन गावांत हे मतदान घेण्यात येणार होतं. पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान घेण्यात येणार होतं. या घोषणेनंतर गावात पोलिसांनी महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या दिला होता. मात्र पोलिसांना कोणतीही कारवाई करण्याची गरजच पडली नाही. गावात मतदान झालंच नाही. कोणीही ग्रामस्थांसोबत याबाबत चर्चा केली नाही. त्यामुळं ग्रामस्थ मतदानाला गेलेच नाहीत.