अमरावती. मुलीचे लग्न जुळल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. एकीकडे खरेदी आणि त्याचवेळी पत्रिका वाटणे सुरू होते. दुग्ध शर्करा योग जुळून यावा तसे मामाच्या मुलीचे देखील लग्न जुळले. मुलींचे लग्नकार्य असल्याने जावई आणि साळा दोघेही आनंदात होते. दोघेही मिळून जवळच्या नातेवाईकाकडे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी सोमवारी एकत्र निघाले होते. पत्रिका वाटून परतिची वाट धरली. वरूडकडे येताना आमनेरनजीक वळण रस्त्यावर (Accident near Amner) एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित झाली. मागील चाकावर आदळल्याने दुचाकीचालविणारे जावई जागीच ठार झाले, तर त्यांचा साळा जखमी (1 dead, 1 injured ) झाला. मुलीचे लग्न जुळल्याने वडिलच सर्वाधिक आनंदी होते. त्यांचाच अपघाती मृत्यू झाल्याने लग्नघरी असणाऱ्या आनंदाच्या वातावरणावर विरजण पडून शोककळा पसरली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील बोरगावात (Borgaon in Karanja Ghadge Taluka of Wardha District) हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे साळ्याच्या घरीसुद्धा चिंतेचे वातावरण आहे.
दिवाकर गजानन घारपुरे (५५) रा. बोरगाव ता. कारंजा घाडगे असे मृताचे तर हरिभजन सदाशिव बोआडे (५१) रा. नारा, ता. कारंजा घाडगे असे जखमीचे नाव आहे. जखमी साळ्याच्या मुलीचे १७ एप्रिलला, तर मृत जावयाच्या मुलीचे २८ एप्रिलला लग्न आहे. या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका द्यायला नागपूर जिल्ह्यातील थुगावदेव येथे गेले होते. वरूडमार्गे ते परत येत होते. आमनेरनजीक वळण रस्त्यावर दुपारी एक वाजताच्या दरम्यान वरूडकडे जाणारी एसटी बस (एमएच ४० एन ५१०३) ला मागून येणाऱ्या दुचाकी (एमएच ४० व्ही ४४९९) ने निघालेल्या साळा-जावयाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अचानक समोरून जड वाहन दिसताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बसच्या मागच्या चाकावर आदळली. यामध्ये दुचाकीचालक दिवाकर घारपुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले हरिभजन बोआडे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात वरूड पोलिस करीत आहे.