नागपूर. उपराजधानी नागपुरात (Nagpur) महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. आमिष दाखवून महिलांचे शोषण करण्याच्या घटना जवळपास रोजच समोर येत आहेत. पण, अगदी कमी वयाच्या घराजवळच्या खेळणाऱ्या मुली देखील सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. अगदी कमी वयातील तीन शाळकरीमुलींवर दोन नराधमांनी अत्याचार (3 schoolgirls molested ) केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटना जरीपटका हद्दीतील (Jaripatka police station limits )आहेत. पहिल्या घटनेत तर 50 वर्षीय व्यक्तीने दोन मुलींना आयुष्यभराची यातना दिल्याचे समोर आले आहे. अन्य एका घटनेत 30 वर्षीय आरोपीने 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. दोन्ही घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनांमुळे उपराजधानी पुरती हादरली असून समाजमन संतप्त झाले आहे. अशा घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलावीत, सोकावलेल्या नराधमांना अटकाव घालण्याची मागणी केली जात आहेत.
जरीपटका हद्दीत राहणाऱ्या 10 आणि 11 वर्षांच्या दोन मैत्रिणी घराच्या छतावर खेळत होत्या. त्याच भागात राहणारा आरोपी महेंद्र गजभिये (50) हा तिथे पोहोचला. परिचयातील व्यक्ती असल्याने मुलीही त्याच्यासोबत खेळू लागल्या. नकळत्या वयातील या मुलींसोबत नको तो प्रकार केला. नराधमाचे शैतानी कृत्य सुरू असतानाच 11 वर्षीय मुलीची मोठी ताई बहिणीला शोधत गच्चीवर पोहोचली. तिने सुरू असलेला सारा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितला. आरोपीचे तिच्याकडेही लक्ष गेले. पण, तिने आरडाओरोड केल्याने आरोपी घाबरला. या प्रकराबाबत कुणाला काहीही सांगितल्यास बघून घेण्याची घमकी घेत तो घटनास्थळावरून निघून गेला. ती दोन्ही मुलींना घेऊन घरी पोहोचली. भीती सोडून सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या घरीसुद्धा घटनेची माहिली दिली गेली. त्यानंतर पालिसांनी जरीपटका ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जलदगतीने तपासचक्र फिरवित आरोपीला अटक केली.
दुसरी घटनासुद्धा जरीपटका हद्दीतीलच आहे. 7 वर्षीय मुलगी खेळता खेळता शेजारी राहणारा आरोपी संघपाल साखरे (३०) याच्या घरी गेली. ती खेळण्यात व्यस्त असताना संघपालच्या मनात नको ते विचार सुरू होते. एका बेसावध क्षणी त्याने मुलीला पकडून नको ते कृत्य केले. मुलगी रडत-रडत घरी गेली. आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीसह आई जरीपटका पोलिस ठाण्यात पोहचली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून संघपालविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.