वंदना के स्वरो मे एक स्वर मेरा मिला लो!
श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा भाव
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 11 |
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी वर उभारल्या जात असलेले भव्य श्रीराम मंदिर ‘राष्ट्र मंदिर’ म्हणून मानले जाईल. कारण या मंदिरासाठी संपूर्ण देशातील प्रत्येक भूभागाचे आणि प्रत्येक समाज घटकांचे योगदान आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने विश्व हिंदू परिषदेने या आंदोलनाचे नेतृत्व केले. पण आंदोलनाच्या यशस्वीतेच्या प्रत्येक टप्प्यावर संघ किंवा विहिंपने श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. विजयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा समग्र हिंदू समाजाचा विजय, ही भावना संघ आणि विहिंप यांनी मांडली. *कवडीचे योगदान नसताना बोलघेवडे श्रेय लाटण्यासाठी भडकाऊ विधाने करत होते. आम्ही होतो, आम्ही होतो, म्हणणारे आणि स्वतःची पाठ थोपटवून घेणारे कमी नाहीत. पण संघ, विहिंप किंवा विचार परिवार कधीही आपल्या ध्येयापासून ढळले नाही. एका संघटनेला श्रेय मिळण्या पेक्षा समग्र हिंदू समाजाची एकता महत्वाची आहे. मंदिर हे निमित्त आहे पण राष्ट्रीय अस्मितेचे जागरण महत्वाचे आहे.* मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाने आपल्या प्रवासात सर्व समाजघटकांना असुरी शक्तींविरोधात संघटित केले. समाजातील उच्च – नीच दरी संपवली. हेच सामाजिक समरसतेचे ध्येय आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिसत होते. म्हणूनच कारसेवेच्या वेळी सर्व समाजघटक एकत्र आले. *श्रीरामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास एका मागासवर्गीय दाम्पत्याच्या हस्ते झाला. सर्व मागास वस्त्या, झोपडपट्टी, वनवासी लोकांचे पाडे, भटक्या विमुक्तांचे तांडे अशा सर्व ठिकाणी श्रीराम शीलापूजन उत्साहात झाले. गावोगावच्या विटा अयोध्येला पाठवण्यात आल्या. श्रीराम महायज्ञात वंचित – पीडितांना यजमान म्हणून स्थान देण्यात आले.
न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी मंदिराचा मार्ग मोकळा केल्यानंतरही ही चळवळ थांबली नाही. मंदिरासाठी लागणाऱ्या निधीत समाजातील शेवटच्या माणसाचाही खारीचा वाटा असला पाहिजे हे धोरण ठरले. वास्तविक पाहता आजचे देशातील वातावरण पाहता दोन चार उद्योगपतींनीच मंदिराला हवा तेवढा निधी देऊन टाकला असता. पण तसे न करता. प्रत्येक घरातून फुल नाही तर किमान फुलांची पाकळी तरी आली पाहिजे. ‘वंदना के इन स्वरो में एक स्वर मेरा मिला लो’ हा भाव देशभर जागविला गेला. दुर्दैवाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील लोकआस्थेची टर उडवली. श्रीरामजन्मभूमी मंदिर निधी संकलनाला त्यांनी खंडणी म्हणून हिणवले. असो, जशी ज्याची दृष्टी तशी त्याची सृष्टी!
या आंदोलनातील एक नवा इतिहास बघा. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराची उभारणी *देशभरातील तब्बल १२ कोटी ७३ लाख ४ हजार कुटुंबांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून केली जात आहे. ५ लाख ३७ हजार १९ गावांमधून त्यासाठी निधी संकलन करण्यात आले होते. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान २२ लाख कार्यकर्त्यांनी हा निधी गोळा केला होता.* कोणतीही संस्था वा कंपनीकडून आर्थिक योगदान घ्यायचे नाही, व्यक्ती म्हणूनच देणगी स्वीकारायची हे तत्त्व पहिल्या दिवशीपासून स्वीकारण्यात आले होते. यात आलेला एकेक रुपया महत्वाचा आहे. कारण त्या रुपयामागे श्रद्धा दडली आहे. तो मंदिराच्या निर्माणात केलेला सहयोग आहे.
श्रीरामजन्मभूमी आंदोलनात महत्वाची भूमिका बजावलेल्या मान्यवरांना आयोजक विसरलेले नाहीत. या संपूर्ण परिसराचे संचालन करणाऱ्या भवनाला अयोध्या आंदोलनाचे महानायक अशोक सिंघल यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक नगरात १२ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. चार हजारावर संतमहंतांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे. १४०० खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
तीर्थक्षेत्रपुरममध्ये सुसज्जतातीर्थक्षेत्र पूरमची उभारणी करण्यात आली आहे. ही एक टेंट सिटी आहे. शेकडो तंबू या ४५ एकर परिसरात उभारण्यात आले आहेत. एकूण सहा नगरांची उभारणी करण्यात आली असून या नगरांना परमहंस रामचंद्र दास, गोरक्ष पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, बाबा राम अभिलाष दास, वामदेव जी महाराज, मोरोपंत पिंगळे आणि ओंकार भावे यांची नावे देण्यात आली आहेत. शेकडो वर्षांनंतर हिंदू समाज हा प्रदीर्घ लढा जिंकला. *कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा तो विजय होता. म्हणूनच हे नवनिर्मित राम मंदिरच नव्हे तर ते ‘राष्ट्र मंदिर’ म्हणून आकाराला येईल, असा विश्वास आहे.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827