
27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन
विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हान्टेज विदर्भ’ची तयारी जोरात सुरू आहे. हा महोत्सव 27 जानेवारी 2024 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ हे खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. या मंचावर विदर्भातील सर्वात मोठे इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह होत आहे.
‘खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भ’ ची काही मुख्य उद्दिष्टे आहे. उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण तयार करून औद्योगिक विकास सुलभ करणे, औद्योगिक कार्याचा विस्तार आणि विविधीकरण अधिक सक्षम करणे, गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून विदर्भ क्षेत्राचे फायदे अधोरेखित करणे आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचे मार्केटिंग आणि पाठपुरावा करणे, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विदर्भातील औद्योगिक विविधता प्रदर्शित करणे, उद्योगांसाठी आव्हाने ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आणि सुरळीत विकास तसेच, कामकाज सुनिश्चित करणे, औद्योगिक क्षेत्राच्या फायद्यासाठी सुधारणांना पाठिंबा देणे तसेच, उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणे यांचा यात समावेश आहे.
‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ एडच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्स्पो, कॉन्क्लेव्ह, सेमिनार यासारखे नियमित उपक्रम आयोजित करणार आहे.
‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ’ स्थानिक उद्योगांना चालना देणारा ठरणार आहे. याशिवाय याठिकाणी तज्ज्ञ मंडळी सोबत संवाद, विविध उद्योग केंद्रित सत्र आयोजित करण्यात आली आहेत. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विदर्भातील सामर्थ्य प्रदर्शित करणे, विकासाच्या मार्गांवर चर्चा, B2B, B2C, आणि B2G अश्या विविध मार्गांनी तरुणांना संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशोगाथा प्रदर्शित करणे देखील महोत्सवात समाविष्ट आहे.
तयारीला आलाय वेग :
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 20 व्यावसायिक सत्रे असतील. ही व्यावसायिक सत्रे विविध औद्योगिक क्षेत्रे, व्यवसाय आणि उद्योजकांसाठी आयोजित केली जातील. तसेच एकूण 240 स्टॉल्स असतील त्यापैकी 90% स्टॉल विदर्भातील कंपन्यांसाठी सवलतीच्या दरात राखीव असतील. महोत्सवासाठीचे एकूण क्षेत्र 2 लाख चौ. फुटांमध्ये विस्तारलेले असून केवळ स्टॉलसाठी सुमारे 60000 चौ. फूट क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका वेळी सुमारे 1500 लोकांच्या बसण्याची क्षमता असलेले 4 हॉल असतील. B2B, B2G परस्परसंवादासाठी नेटवर्किंग लाउंज आणि कॉन्फरन्स रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात विदर्भातील खाद्यपदार्थांची विक्री आणि प्रदर्शन करणारे फूड लाउंज असेल. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टॉल आरक्षित करणे, सत्रांमध्ये भाग घेणे आणि विक्रेता नोंदणीसारख्या इतर सर्व आवश्यकतांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने अधिक माहितीसाठी www.advantagevidharbha.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्वेल्स ऑफ विदर्भ :
विदर्भाच्या मातीत ज्यांनी आपले उद्योग सुरू केले, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आणि विदर्भ, महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक विकासात भरीव योगदान दिले त्या सर्व ‘ज्वेल्स ऑफ विदर्भ’ चा या महोत्सवात सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या यशोगाथांचे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले जाणार असून त्यांच्या उत्पादनांना प्रदर्शित करण्याकरीता स्वतंत्र डोम तयार करण्यात आला आहे. याशिवाय, प्रदर्शनीत नवतंत्रज्ञान, विशिष्ट तंत्रांचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनदेखील बघायला मिळेल. विदर्भात सर्व उद्योग पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत, हे विशेष.
विविध औद्योगिक संघटनांचा सहभाग :
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भचे प्रमुख प्रायोजक असून आयआयएम नागपूर सहप्रायोजक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे नॉलेज पार्टनर आहेत. एमएसएमई, एमआयडीसी आणि एमएडीसी यांचे आयोजनासाठी सहकार्य लाभत आहे. व्हीआयए, बीएमए, एमआयए, सीओएसआयए, व्हीपीआयए, इलेक्ट्रीकल असोसिएशन, एफआयए, वेद, व्हीडीआयएच, व्हीएडीए, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन, टीआयई नागपूर, व्हीसीसीआय अकोला, एआयआरईए, एमगिरी, लघू उद्योग भारती, एआयए, क्रेडाई, जेजेई, सीए असोसिएशन, एसएमए, विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल असोसिएशन, व्हीएडीए, एमसीडीसी, क्रेडाई या औद्योगिक संघटनांचा आयोजनात सहभाग आहे.
विविध क्षेत्रांचा सहभाग :
कापड, प्लास्टिक, खनिजे, कोळसा, मिथेनॉल/इथेनॉल, पर्यटन, विमान वाहतूक, लॉजिस्टिक, आयटी, आरोग्य, फार्मा, रेडिमेड, रत्ने आणि दागिने, इमारती लाकूड, बांबू, कोल्ड स्टोरेज, सार्वजनिक चाचणी प्रयोगशाळा, मनोरंजन, शिक्षण, कृषी उपकरणे, संरक्षण, बियाणे/कृषी प्रक्रिया, , मत्स्यपालन, ऊर्जा, सौर, कागद आणि संबंधित उद्योग, खाणकाम, पोलाद आणि संबंधित उद्योग, रिअल इस्टेट, तेल शुद्धीकरण इत्यादी क्षेत्रे अॅडव्हान्टेज विदर्भात सहभागी होत असून त्यांचे स्टॉलदेखील प्रदर्शनीमध्ये राहणार आहेत.
हॉटेल तुली इंपेरिअल, रामदासपेठ येथे ‘खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भ’ च्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केले. एडचे अध्यक्ष आशिष काळे; एड चे उपाध्यक्ष प्रणव शर्मा आणि गिरधारी मंत्री; सचिव डॉ.विजय शर्मा; कोषाध्यक्ष राजेश बागडी व सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ.महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, रवींद्र बोरटकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.