जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने

0

जालना-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कुठलाही तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे हे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव असून (Maratha Reservation) २४ जानेवारीला त्यांचा मुक्काम लोणावळा येथे राहणार आहे. त्यासाठी दोनशे एकर मैदानावर मराठा आंदोलनकर्ते आणि जरांगे यांच्या राहण्याची सोय करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना मोर्चा टाळण्याचे आवाहन करत म्हटलं की, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे.

लोणावळ्यात त्यांच्या स्वागताचीही जंगी तयारी करण्यात येत आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी ५१ जेसीबी आणि २ क्रेन आहेत. यावरून जरांगे पाटलांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे. मुंबईत आंदोलन करण्यावर ते ठाम आहेत. ते आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथून हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे आणि राज्य सरकार (Maratha Reservation) यांच्यातील तणाव वाढल्याची माहिती मिळत आहे. आंदोलक पायी चालत २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. २६ जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण देखील करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जरांगे यांना मोर्चा थांबविण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेणार आहे. त्यावेळी आम्ही मराठा आरक्षणासाठी कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, हा शब्द आम्ही दिलेला आहे. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाच्या पावित्र्यात जाण्यापेक्षा सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे”
मराठा समाजाला ‘सरसकट’ कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा, ही जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. पण सरकारच्या मते, केवळ ज्या मराठा लोकांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच आरक्षण देण्यात येईल. याशिवाय सरकार फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कायदा आणणार आहे.