विदर्भाचे मार्केटिंग करणे गरजेचे – रमेश मंत्री

0

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड)ची बैठक संपन्‍न

विदर्भ पूर्वीसारखा मागास राहिलेला नसून आता येथे मेडीकल व एज्‍युकशेन हब झालेले आहे. उत्‍तम विमानतळ, रस्‍ते आदी दळणवळणाच्‍या उत्‍तम सुविधाही निर्माण झाल्‍या आहेत. नैसर्गिक आपत्‍तींची संभावना कमी असून येथील वातावरणही शांत आहे. त्‍यामुळे विदर्भाकडे मोठे उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्‍यासाठी विदर्भाचे मार्केटिंग करण्‍याची खरी गरज आहे, असे मत भाजपाचे माजी शहराध्‍यक्ष व उद्योजक रमेश मंत्री यांनी व्‍यक्‍त केले.Vidarbha needs to be marketed – Ramesh Mantri 

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट Association for Industrial Development (एड) तर्फे येत्‍या जानेवारी महिन्‍यात खासदार औद्योग‍िक महोत्‍सव ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’ चे आयोजन करण्‍यात येणार आहे. ‘पाथ टू ग्रोथ’ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेवर हा महोत्‍सव आधारित राहणार आहे. या महोत्‍सवाच्‍या तयारीसाठी येत्‍या 27 ऑक्‍टोबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहणार आहे. या बैठकीच्‍या पूर्वतयारीच्‍या निमित्‍ताने विविध औद्योग‍िक क्षेत्रातील संयोजक व उपसंयोजकांची बैठक शनिवारी हॉटेल अशोका येथे पार पडली. या बैठकीला विदर्भातील सुमारे 40 औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्‍थ‍ित होते. मंचावर असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) चे अध्‍यक्ष आशिष काळे, उपाध्‍यक्ष गिरीधारी मंत्री, सचिव डॉ. विजय शर्मा व कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

विदर्भ मागासलेला आहे, विदर्भाचा विकास व्‍हावा, अशी ओरड करण्‍यापेक्षा विदर्भात मोठे उद्योग कसे येतील, त्‍याला पूरक उद्योग कसे सुरू होती, तरुण वर्गाचा बाहेर जाणारा लोंढा कसा थांबवता येईल याचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन ‘एड’ची स्‍थापना केली आहे. विदर्भाचा विकास साधण्‍यासाठी औद्याग‍िक महोत्‍सव आयोज‍ित करण्‍यासारखे मोठे पाऊल उचलले जात असून विदर्भातील सर्व उद्योजकांनी एकत्र यावे, आपसातील समन्‍वय वाढवावा व या उपक्रमात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन रमेश मंत्री यावेळी केले.

डॉ. विजय शर्मा यांनी नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून विदर्भातील 44 औद्योगिक क्षेत्र या आयोजनात जोडले गेले असल्‍याची माह‍िती दिली. आशीष काळे यांनी एडच्‍या कार्याची माहिती देताना औद्योग‍िक महोत्‍सवानिमित्‍त आयोज‍ित करण्‍यात येणा-या प्रदर्शनाला वर्ल्‍ड ट्रेड सेंटरचे आर्थिक पाठबळ मिळाल्‍याचे सांगितले. सूक्ष्‍म, लघू व मध्‍यम उद्योग महाराष्‍ट्रचे संचालक पी. एम. पार्लेवार यांनीदेखील यावेळी संबोधित केले. उपस्थित संयोजकांच्‍या विविध शंकांचे यावेळी निरसन करण्‍यात आले व महोत्‍सवाच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी त्‍यांच्‍याकडून सूचना मागवण्‍यात आल्‍या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश बागडी यांनी केले.