महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वॉर विजय वडेट्टीवार यांचा आरोप

0

 

नागपूर- या राज्यात सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? त्यावेळी विरोधी पक्षात असताना म्हणायचे कुठे नेला महाराष्ट्र माझा? आता कुठे खड्ड्यात घातलाय महाराष्ट्र माझा? अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. पोलिसांच्या केबिनमध्ये जाऊन तो गोळीबार करणारा सरावलेला गुंड आहे.

सत्तेच्या भरवश्यावर यांची दादागिरी वाढलेली आहे. किंबहुना महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वॉर सुरू असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यात निवडणुका जवळ जवळ येतील तसे तसे मारामारी, गोळीबार होईल, हे सगळं बघायला मिळेल. हा थेट भूमाफियाचा विषय आहे. भ्रष्टाचार, जमिनी हडपण्याची अनेक उदाहरणे देता येईल. अशा पद्धतीने पैसे कमवण्याचं काम हे सरकारमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना होणे, पुढच्या काळात काय होईल? याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने लावायला हवा. सगळीकडे गुंड पोसून महाराष्ट्रातील राजकारण सुरू आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आंबेडकर इंडिया आघाडीबद्दल बोलताना आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत हे म्हणाले त्याकडेही लक्ष द्यायला हवे. पॉझिटिव्ह बघा.
ते बैठकीत आले, चर्चा झाली, चर्चेची एक फेरी संपली. दुसरी फेरी सुरू होईल. चार पक्ष एकत्र येऊन आघाडी करतात, तेव्हा चर्चा चालत असते. एकाच बैठकीत सर्व काही संपत नाही.
विदर्भातील जागा संदर्भात फक्त चर्चा सुरू आहे.अद्याप काही अंतिम नाही, चर्चेमध्ये या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. ओबीसी प्रश्नी आम्ही सर्व एक आहोत.
छगन भुजबळांनी जे आंदोलन सुरू केलं, त्या सभेला मी जाणार होतो. मात्र, मतदारसंघातील पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने आजच्या सभेला मी जाऊ शकत नाही. पुढच्या सभेला मी नक्की जाणार आहे. ओबीसीच्या लढ्यात लढाई लढताना मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसींचे शक्ती स्थळ आहे. त्या ठिकाणी मी यात्रेची सुरुवात करणार आहे. ओबीसींच्या लढ्यासाठी आम्ही सोबत आहोत.
असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.