नागपूर -बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती, या भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संपर्कप्रमुख आ दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढला. कळमन्यातील चिखली चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, चंपा हाय हाय, भाजप तेरी तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला, यावेळी तिवारी म्हणाले की, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कधीही सहन करणार नाहीत.
भाजपच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून बाळासाहेबांचा अवमान करण्याचा हा डाव असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. शिंदे यांच्यावर निशाणा साधताना, बाळासाहेबांच्या नावावर गद्दारी करून सत्ता मिळवणारे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर राजीनामा का मागत नाहीत, असा सवालही केला. गद्दारांमध्ये बाळासाहेबांबद्दल प्रेमाचा अंशही उरला असेल, तर मुख्यमंत्री राजीनामा देण्याची हिंमत दाखवतील का ? आणि या षडयंत्रात भाजपचा सहभाग नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना दूर करावे अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा युवा अधिकारी प्रीतम कापसे, सचिन मुन्ना तिवारी, नाना झोडे, सुरेखा खोब्रागडे, मंगला गवरे, नीलिमा शास्त्री, अंजू गुप्ता, आशा इंगळे, रंजना राजबांडे, विभागप्रमुख अंगद हिरोंडे, हरीश रामटेके, अंकुश भोवते, शिवशंकर मिश्रा, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.