नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा येत्या 16 एप्रिल रोजी दर्शन कॉलनीतील क्रीडा मैदानावर होणार आहे. या सभेला लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे ही सभाच रदद करण्यात यावी, या मागणीकरिता धीरज शर्मा यांनी नागपूर खंडपीठात बुधवारी याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर गुरूवारी सकाळी सुनावणी होणार आहे. अर्थातच हायकोर्ट या याचिकेवर काय निर्णय देणार याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजप नेत्यांचे लक्ष लागलेले आहे. दर्शन कॉलनी सद्भावनानगर , नंदनवन क्रीडा मैदान बचाव समितीचे शर्मा यांनी या सभेला विरोध केला आहे. आमदार कृष्णा खोपडे यांचे माध्यमातून भाजपने याविरोधात आंदोलन छेडले आहे. स्थानिक नागरिक, नगरसेवक, क्रीडाप्रेमी यात उतरले आहेत.ही सभा गैरकायदेशीर असल्याचे याचिकाकर्ते शर्मा यांचे म्हणणे आहे. मैदान बचाव समितीच्या वतीने मंगळवार सकाळपासून हनुमान चालिसा पठणाला सुरूवात करण्यात आली. आज परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या सभेला उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उध्दव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्यामुळे सभेला मोठया प्रमाणात कायकर्त्यांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे ही सभाच रदद करावी आणि मैदान वाचवावे बचाव अशी मागणी शर्मा यांनी याचिकेत केली आहे.