नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या भाजपच्या मंत्री, आमदारांनी मंगळवारी सकाळी ७ दरम्यान रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृतीभवन येथे जाऊन डॉ. हेडगेवारांना पुष्प अर्पित करून अभिवादन केले. यावेळी मंत्र्यांबरोबर आमदार, महिला आमदारही सहभागी झाल्या होत्या. एका बंद खोलीत ४५ मिनीटे संघाच्या पदाधिकारी व वरिष्ठ कार्यकर्त्यांनी संवाद साधून संघाच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून नागपूरमध्ये अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार हेडगेवार स्मृतीभवनाला भेट देवून अभिवादन करतात. यावेळी परिचय देण्यात येतो, संघातर्फे एक पुस्तक देण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिहिलेलं भविष्य का भारत यावेळी भेट देण्यात आलं असे फडणवीस यांनी सांगितले.