वादग्रस्त ठरविल्या गेलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले सरसंघचालक डॉ. भागवत?

0

       भागलपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेवर भाष्य करताना जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली, असे वक्तव्य केले होते. मात्र, या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर डॉ. भागवत यांनी (RSS Chief Mohan Bhagwat) खुलासा केला. बिहारच्या भागलपूर येथे स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत म्हणाले की, मी कधीही ब्राह्मण हा शब्द वापरला नाही तर, पंडित शब्द वापरला होता. पंडित कोणत्याही जातीचा असू शकतो. जो बुद्धिमान असतो त्याला पंडित म्हणतात, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. वादाशी संबंधित अनावश्यक विषयांवर चर्चा करण्याऐवजी राष्ट्र उभारणीवर चर्चा व्हावी व ते खूप चांगले होईल, असा सल्लाही भागवत यांनी यावेळी दिला.

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस च्या एका चौपईवरून सध्या वाद सुरु असून त्यावर भाष्य करताना वाद सुरू असताना मोहन भागवत यांनी मुंबईत संत रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. भागवत म्हणाले होते की, जात ही देवाने निर्माण केलेली नाही तर, जात पंडितांनी निर्माण केली आहे. जे चुकीचे आहे. देवासाठी आपण सर्व एक आहोत. आधी आपल्या समाजात फूट पाडून देशात हल्ले झाले. मग त्याचा फायदा बाहेरच्या लोकांनी घेतला. नाहीतर आमच्याकडे बघायची हिंमत कोणाची नव्हती. याला कोणीही जबाबदार नाही. समाजातील आपुलकी संपली की स्वार्थ आपोआप मोठा होतो, असेही डॉ. भागवत म्हणाले होते. मात्र, भागवत यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला होता.