नागपूरः राज्यमंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नसताना नागपुरात अधिवेशनासाठी नाग भवन परिसरातील राज्य मंत्र्यांच्या बंगल्यांची रंगरंगोटी का करण्यात आली, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला. हरकतीच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना राज्य सरकार एका बाजुला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपये बाजारातून उभे करते तर दुसरीकडे सरकार पैशाचा अशा पद्धतीने अपव्यय करते, असा आरोप प्रभू यांनी (MLA Sunil Prabhu on Nag Bhavan Bungalows) केला. मात्र, हा आरोप करणाऱ्या प्रभू यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, अधिवेशनाच्या निमित्ताने बंगल्यांची रंगरंगोटी होत असते.
पीडब्ल्यूडी विभागाला थोडीच माहिती असते की आम्ही कोणत्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत ते. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रिमंडळ विस्तार करू शकतो. तुम्हाला संधी हवी आहे का? असा खोचक टोलाही फडणवीस यांनी प्रभू यांना लगावला. त्यावर सभागृहाच एकच हशा पिकला. रंगरंगोटीवर कोट्यवधी वगैरे खर्च झालेले नाहीत. जेवढे खर्च होतात, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असेही फडणवीस यांनी प्रभू यांना सुनावले.