
नागपूर(Nagpur),
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ(RTMNU) येथे ग्राहक चळवळीवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी विनंती मा. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र, विदर्भ प्रांततर्फे करण्यात आली.
Consumer Protection Act, 2019 अंतर्गत ग्राहक जागरूकता व संरक्षणास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठात “ग्राहक चळवळ, ग्राहक हक्क व ग्राहक कायदे” या विषयावर प्रमाणपत्र, पदविका किंवा ऐच्छिक अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. यासाठी आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रिया राबवून अभ्यासक्रमास विद्यापीठाच्या अधिसभेची मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागरूकता वाढेल, तसेच संबंधित क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील. आपण या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, विधी सल्लागार ॲड.पल्लवी खापरीकर, नितीन मुकेवार, प्रशांत लांजेवार, निकेश कावळे व सुविधी जयस्वाल आदी पदाधिकाऱ्यांनी मा. कुलगुरूंना निवेदन सादर केले.
कुलगुरू मनाली क्षीरसागर यांना निवेदन देताना श्यामकांत पात्रीकर, डॉ. कल्पना उपाध्याय, ॲड. पल्लवी खापरीकर, नितीन मुकेवार, प्रशांत लांजेवार, निकेश कावळे आणि सुविधी जयस्वाल.















