“गोडसेच्या गोळीने गांधीजींची हत्या नाही..”, कोणी केला दावा?

0

मुंबई-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत रणजित सावरकर यांनी नवा दावा केला आहे. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झालेल्या गोळीने झाली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सावरकर यांच्या मते या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही. त्याचा फायदा नेहरू घराण्याला झाला. तत्कालीन न्यायसहायक (फॉरेन्सिक) विभागाच्या अहवालाच्या आधारे आपण हा दावा करीत असल्याचे सावरकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील दडपलेले पुरावे बाहेर काढण्यासाठी दुसरा आयोग नेमण्यात यावा, अशी मागणीही सावरकर यांनी केलीय.

रणजित सावरकर यांनी सांगितले की, गांधी हत्येनंतर २० वर्षांनी कपूर आयोग नेमला गेला. मी आयोगाच्या निष्कर्षांचा अभ्यास सुरु केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारलाही नाही आणि स्वीकारलाही नाही. मी कुठलेही स्पेक्युलेशन करीत नाही. न्यायसहायक अहवालातून आपले निष्कर्ष मांडत आहे. नथुराम गोडसे यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन देखील झाले नाही. गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला. २ फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही. मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता. पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत. हे सगळे मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. नथुराम गोडसे हे गांधी यांची हत्या करायला आले होते, हे १०० टक्के खरे आहे. त्यांनी गोळ्या देखील झाडल्या आहेत, हे देखील १०० टक्के खरे आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने गांधींची हत्या झाली नाही, असे सावरकर म्हणाले.

सावरकर म्हणाले की, गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला. हे प्रश्न लोकांनी उपस्थित केले पाहिजे. मी केंद्र सरकारकडे फेरतपासाची मागणी करणार नाही. ही मागणी लोकांनी केली पाहिजे. यावरील आपले पुस्तक येऊ नये, यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला. त्यामुळे हे पुस्तक मी स्वतःच प्रकाशित केले. अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणाला नकार दिला, असा दावाही त्यांनी केलाय.