शेतकऱ्यांच्या लाँग मार्चवर आज निघणार का तोडगा?, शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला

0

मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी निघालेल्या किसान सभेच्या लाँग मार्चचे शिष्टमंडळाची गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Kisan Sabha Long March) यांच्यासोबत बैठक होणार आहे. किसान सभेचे १२ जणांचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी होणार आहे. दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघणार की कसे? याकडे लक्ष लागले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची भूमिका किसान सभेने घेतली आहे.
यासंदर्भात माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले की, आम्ही आज सरकारसोबत बैठकीला जाणार आहोत. आमच्या काही मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांच्यासोबत काल चर्चा झाली. काही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायचे आहेत. सकारात्मक चर्चा व्हावी ही अपेक्षा असल्याचे गावित म्हणाले. समाधान झाले नाही तर मोर्चा सुरुच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत असून काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असेही ते म्हणाले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा हे पक्ष आणि संघटना, तर माजी आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे आणि डॉ. डी. एल. कराड हे नेते या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत.
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधार मात्र 2 हजार रुपये निश्चित करून लाल कांद्याला 500 ते 600 रूपये अनुदान जाहीर करावे, जमीन कसणाऱ्यांच्या कब्जात असलेली 4 हेक्टरपर्यंतची वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून 7/12 वर नाव लावावे, ही सर्व जमीन कसण्यालायक आहे, असा शेरा मारावा, वन जमिनींचे अपात्र दावे मंजूर करावे, देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करावे, ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत, ती घरे नियमित करावीत, शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज दिवसा सलग 12 तास उपलब्ध करून द्यावी, शेतकन्यांची थकीत वीज बिले माफ करावीत, शेतकऱ्यांची शेती विषयक संपूर्ण कर्जमाफ करून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा, अवकाळी पावसाने आणि वर्षभर सुरु असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एनडीआरएफमधून तात्काळ भरपाई द्यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत.

 

https://youtu.be/08O4bzz3c-g