महिलांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक

0

पोलीस उपअधिक्षक श्वेता खाडे यांचे प्रतिपादन

आज महिला प्रत्येकच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. भारत महासत्ता बनण्यामध्ये महिलांनी देखील सक्रीय योगदान द्यावयास हवे, यासाठी प्रत्येक स्त्रीने कौटुंबिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या संपन्न आणि आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे, तसेच स्त्रीयांनी आणि विद्यार्थीनी सायबर गुन्हयाच्या बाबतीत देखील अतिशय जागरूक असावे असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक श्वेता खाडे यांनी केले.

सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.गुरूवारी पार पडलेल्या या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद जोशी हे होते. याच कार्यक्रमामध्ये सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर आणि मध्यप्रदेश शिक्षण संस्थेचे सचिव श्री मोहन नाहातकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ अनुराधा रिधोरकर यांनी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची गरज असुन चाळीशीनंतर प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची वर्षातुन एकदातरी तपासणी करावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना प्रचार्य डॉ अरविंद जोशी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक महाविद्यालय आणि त्या परिसरातील सर्वच शाळा, शैक्षणिक संस्था यांचा समन्वय असणे खुप महत्वाचे असणार आहे, तरच प्रत्येक महाविद्यालय किवा शैक्षणिक संस्था नवीन आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अन्यथा शैक्षणिक संस्था बंद पडण्याचा धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाध्ये सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या महाल परिसरातील विविध शाळांच्या महिला मुख्याध्यापिकांचा शाल, श्रीफल आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या वुमेन्स सेलच्या प्रमुख डॉ रश्मी पारस्कर सोवनी यांनी केले तर डॉ. चंद्रहास दीक्षित यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विभा क्षीरसागर आणि प्राध्यापक विवेक अलोणी यांनी केले.