
नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ) यजमानपदाखाली इंडियन सायन्स काँग्रेसचे (Indian Science Congress ) आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत महिला विज्ञान काँग्रेसही (Women’s Science Congress ) होणार आहे. त्यासाठी देशभरातून जवळपास 5 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यामध्ये शहरी करिअर महिलांपासून ते आदिवासी महिलांपर्यंत हजेरी लावतील. 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता महिला सायन्स काँग्रेसचे उद्घाटन शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कल्पना पांडे यांनी दिली. प्रमुख पाहुण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि सेलिब्रिटी टीना अंबानी, सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त “सीड मदर” राहीबाई पोपरे यांचा समावेश आहे. परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
आरटीएम नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमधील हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 80 हून अधिक वक्ते महिला सक्षमीकरण आणि कल्याणाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव शेअर करतील.
आदिवासी विज्ञान काँग्रेस
आदिवासी विज्ञान काँग्रेसचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भारत सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अधिवेशनाचे निमंत्रक डॉ. शामराव कोरेती यांनी दिली. तांत्रिक सत्रात आदिवासी विकासाची आव्हाने, गडचिरोलीतील आदिवासी महिलांची उन्नती, राजस्थानच्या आदिवासींच्या रोजगार निर्मितीसाठी व्हर्मिन बायोटेक्नॉलॉजीचा वापर, आदिवासी खाद्यपदार्थांचे आरोग्य फायदे आणि नागालँड आणि ओडिशातील आदिवासी महिलांवरील अभ्यास या विषयांवर व्याख्याने असतील. दुपारी 2.30 वाजता आदिवासी नेते संवाद साधतील. सायंकाळी 5.30 वाजता समारोप समारंभासाठी महारोगी सेवा समिती, वरोराचे सचिव डॉ. विकास आमटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, गांधीनगरचे कुलगुरू प्रा. अर्जुनसिंह राणा हे सन्माननीय अतिथी असतील तर आरटीएम नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे हे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.