नागपूर : महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमूठ सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरूवारी यासंदर्भात परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी सभेला परवानगी दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी हायकोर्टाने काँग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी वनवे यांना प्रतिवादी करून त्यांच्यासह नासुप्र, मनपा व इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. याप्रकरणी सोमवार , २४ एप्रिलपर्यंत हायकोर्टाने सर्व प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले असून अटी व शर्तीनुसार ही सभा झाली की नाही यावर पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार आहे. मविआची राज्यातील दुसरी वज्रमूठ सभा रविवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दर्शन कॉलनीतील क्रीडा मैदानावर होणार आहे. या सभेला लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे ही होणारी वज्रमूठ सभाच रदद करण्यात यावी, या मागणीकरिता बुधवारी धीरज शर्मा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र,पोलीस विभागासह नासुप्र, मनपाने या सभेला पूर्वीच परवानगी दिल्यामुळे याचिकाकर्त्याचे म्हणणे हायकोर्टात निरर्थक ठरले. दर्शन कॉलनी सद्भावनानगर , नंदनवन क्रीडा मैदान बचाव समितीचे शर्मा यांनी या सभेला विरोध केला होता. या मैदानात लाखो कार्यकर्ते बसू शकणार नाही, गर्दी रस्त्यावर येईल. त्यामुळे ही सभाच रदद करावी, अशी मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेला मैदान बचाव समितीच्या वतीने मंगळवार सकाळपासून हनुमान चालिसा पठणाला सुरूवात करण्यात आली. भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मागील काही दिवसांपासून या सभेला कडाडून विरोध केला.