Nagpur News : गायत्री महायज्ञात 5 हजार भाविकांचा सहभाग

0

नागपूर (Nagpur) ,मारुती देवस्थान ट्रस्ट रामदासपेठ आणि अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील गायत्री तीर्थस्थळावर आयोजित पाच दिवसीय गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती बुधवारी करण्यात आली. यात पाच दिवसीय गायत्री महायज्ञात एकूण 5 हजार, तर पावन प्रज्ञा पुराण कथा श्रवणात 8 हजार भाविकांचा सहभाग असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

– प्रज्ञा पुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आज बुधवारी सकाळी चार टप्प्यात 1200 भाविकांनी यज्ञात आहुती समर्पित केली. यात सत्यनारायण नुवाल, जीवन अग्रवाल, गिरीश व्यास, सतीश बंग, धनराज टावरी व सतीश रावल यांचा सहभाग होता. यज्ञाच्या पूर्णाहुतीनिमित्त यज्ञोपवित, अन्नप्राशन, नामकरण, जन्मदिन आदी संस्कार व यज्ञ दीक्षा सोहळा झाला. त्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाने या सोहळयाची सांगता झाली.
चार दिवसीय पावन प्रज्ञा पुराण कथेचे प्रवचन पं. श्यामबिहारी दुबे यांनी रसाळ वाणीद्वारे केले व त्यास भाविकांचा प्रतिसाद देखील लाभला. कथावाचनाचा समारोप मंगळवारी सायंकाळी 1008 दिव्यांच्या दीपयज्ञाने झाला. त्याचवेळी 30 बाय 20 फुटाची भारतमातेची भव्य रांगोळी साकारण्यात आली त्यावर दिव्यांची कल्पक रचना करून दीपयज्ञ साजरा करण्यात आला.
सोहळ्याचा मुख्य भाग गायत्री महायज्ञ पाच दिवसांचा होता.

– विविध संस्कार व दीक्षा सोहळा

त्यात एकूण 5 हजार भाविकांचा सहभाग होता. महायज्ञ पूर्णाहूतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ 2 हजार भाविकांनी घेतला. गायत्री महायज्ञाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, वागणूक संस्कार, घरगुती संस्कार, सामाजिक कर्तव्य आदींची माहिती देण्यात आली. समाजात सुसंस्कार रुजावेत यासाठी गायत्री परिवारातर्फे हे आयोजन देशातील विविध शहरांमध्ये करण्यात येते. यावेळी हे शिवधनुष्य मारुती देवस्थान ट्रस्ट रामदासपेठ यांनी यशस्वीरित्या पेलले असल्याचे दिसून आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पत्की, विनय दाणी, दीपक हेडा यांच्या नेतृत्वात नरेंद्र आसरकर, आशिष नाईक, बागेश महाजन, श्रीकांत पळशीकर, शोभा आपटे, लता जोशी, मुक्ता दाणी, अश्विनी वाघमारे, विवेक गुप्ता, पांडुरंग सुरंगे, शशी देशकर यांनी परिश्रम घेतले.