६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग यांची निवड

0

नागपूर: या महिन्याच्या १६,१७ आणि १८ या तारखांना चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या (Vidarbha Sahitya Sammelan) अध्यक्षपदी सुप्रसिध्द समीक्षक आणि ललितलेखक म्हणून प्रसिध्द असलेले ज्येष्ठ साहित्यिक (Vidarbha Sahitya Sangha) डॉ.वि.स.जोग यांची संमेलनाध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे निवड करण्यात आली. चंद्रपूरची सर्वोदय शिक्षण संस्था, सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि गोंडवना विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन होत असून विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना हे संमेलन समर्पित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडा झालेले डॉ. वि.स. जोग हे महाराष्ट्राचे विचारवंत आणि ललित लेखक म्हणून मान्यता पावलेले साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक, चित्रपटविषयक समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र अशा विविध वाङ् मय प्रकारात त्यांनी लेखन केलेले असून त्यांच्या लेखनाला विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.‘दुपार’, ‘नातं’ हे कथासंग्रह; ‘आई’, ‘आम्ही’, ‘संहार’,‘ग्रीष्मदाह’, ‘मकरंद मुमताज’ या कादंबऱ्या; ‘शह-प्रतिशह’, ‘तिघांच्या तीन तऱ्हा’ ही नाटके; ‘दोन झुंजार पत्रकार’,‘कवी आणि कविता’, ‘सावरकर आंबेडकर विचार समीक्षा’,या समीक्षालेखनासोबतच ‘मार्क्सवाद आणि मराठी साहित्य’ आणि ‘मार्क्सवाद आणि दलित साहित्य’ हे मराठी साहित्याची मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून मांडणी करणारे महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत.

त्याशिवाय ‘गरुडझेप’, ‘युगस्पंदन’, ‘डॉ.अ. ना. देशपांडे स्मृतीग्रंथ’,‘साहित्यिक खांडेकर’, ‘भारतीय कम्युनिष्ट’,‘देशगौरव सुभाषचंद्र बोस’,‘कवी आणि कविता’,‘अभिनय सम्राज्ञी मीनाकुमारी’,‘सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला’,‘यश अपयश’,‘रुपेरी इतिहासाची सोनेरी पाने’ इत्यादी सुमारे बत्तीसच्या वर पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना या लेखनासाठी विदर्भ साहित्य संघाचे वाङ् मय पुरस्कार, पु.भा. भावे पुरस्कार इत्यादी पुरस्कारांसोबतच विदर्भ साहित्य संघाचा महत्त्वाचा समाजाला जाणारा जीवनव्रती पुरस्कार आणि सोविएत लँड नेहरू पुरस्काराने गौरविले आहेत. त्याशिवाय अनेक विभागीय साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे ही त्यांनी भूषविली आहेत.नागपूर येथील सी.पी.अँड बेरार या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणून घालविलेल्या कारकीर्दीत अनेक संशोधक विद्यार्थीही त्यांनी घडविले आहेत. सामाजिक चळवळीत वावरत असताना अनेक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्यानेही दिली आहेत. विदर्भातील जुन्या पिढीतील एक महत्त्वाचे अष्टावधानी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांना या संमेलनाचे अध्यक्षपद विदर्भ साहित्य संघाने बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. या निमित्ताने विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री.प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस श्री. विलास मानेकर, श्रीमती रंजना दाते आणि आयोजन समितीचे अध्वर्यू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, संमेलन समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रमोद काटकर, सहकार्यवाह श्री.इरफान शेख यांनी डॉ. जोग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा