बुलढाणाः बुलडाणा जिल्ह्यात एसटी बस आणि कंटेनरचा भीषण होऊन झालेल्या भीषण अपघातात बसमधील 5 प्रवाश्यांचा मृत्यू झाला, तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती (Accident in Buldana District) आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मेहकर आगाराची ही बस ही पुण्यावरून मेहकरकडे येत होती. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. जखमींमध्ये दुसरबीड येथील काही जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमींबाबत अद्याप सविस्तर माहिती स्पष्ट झालेली नाही. अपघातामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली.
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
अमरावती, 23 मे : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून हे सर्वजण अमरावती येथून लग्न समारंभ आटोपून परतत होते. दरम्यान अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.
दर्यापूर येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्न कार्यासाठी अंजनगाव सूर्जी येथे गेले होते. लग्न कार्य (वलीमा) आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना इटकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनालाल जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान सर्व जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे दर्यापूरवरून 9 जणांना अमरावती पाठविण्यात आले. जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दोघांना मृत घोषित केले. त्याचवेळी उर्वरित 6 जखमींवर सध्या शहरातील पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळतात खल्लार पोलिसांसह ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमी एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसीं दिली.