मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President) यांनी सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात (ED Enquiry)आली. या चौकशीनंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून पाठिंबा दर्शविला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार व त्यांचा गट या घडामोडींपासून दूर असल्याची माहिती आहे. पक्षातील अनेक नेते त्यांच्यापासून अंतर राखून असल्याची कुजबुज सुरु आहे. अजित पवार यांच्याकडून कुठलाही फोन आला नसल्याचे उत्तर जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. यातून राष्ट्रवादीमध्ये दोन गटात धुसफूस सुरुच असल्याचे संकेत मिळत आहेत.
जवळपास साडेनऊ तास जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात होते. चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात आक्रमक निदर्शने करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी प्रदेश कार्यालयात हजर असणे अपेक्षित होते. पण, जयंत पाटील यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असताना कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राजेश टोपे, धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांच्यापैकी कोणीही प्रदेश कार्यालयात दिसले नाही. फक्त जितेंद्र आव्हाडच प्रदेश कार्यालयात हजर होते, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली. मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांच्याशी कुठलाही संपर्क साधला गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जयंत पाटील यांनी याबाबत अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. दरम्यान, आज जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली.