मुंबईः नव्याने उभारण्यात आलेल्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच झाले पाहीजे, अशी मागणी विरोधकांकडून (New Parliament Building Inauguration ) सुरु असताना राष्ट्रपतींना या उद्घाटनाचे आमंत्रणच नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. (Shiv Sena MP Sanjay Raut) लोकशाहीसाठी ही गंभीर बाब अून विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पक्षही त्यात सहभागी होईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाल ेकी, राष्ट्रपती हे लोकशाहीचे, संसदेचे कस्टोडीयन म्हणजेच संरक्षक असतात. मात्र, आता त्यानांच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला निमंत्रण नसेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हावे, या काँग्रेसच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. देशात सर्वात प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींचे स्थान आहे. त्यानंतर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांचे स्थान आहे. पण, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे, हा मोदी सरकारचा स्वभाव आहे. मुळात देशाला नव्या संसद भवनाची काहीही गरज नाही. मात्र, एका राजकीय हव्यासापोटी ही इमारत बांधली गेली आहे. त्यासाठी कोरोना काळात लाखो, कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मी नवी दिल्ली घडवली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिरवायचे आहे. त्यामुळेच राष्ट्रपतींना डावलून या नव्या इमारतीचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला सर्व कॅमेरे फक्त मोदींवर असतील. केवळ त्यासाठी राष्ट्रपतींना डावलले, ही गंभीर बाब असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.