चकमकीत एकूण 13 नक्षलवादी ठार

0

 

छत्तीसगड  (Chhattisgarh): 

13 naxalites were killed in the Chhattisgarh encounter

जंगलात बुधवारी आढळून आले आणखी 3 मृतदेह

बिजापूर (Bijapur), 03 एप्रिल  : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गांगलूर भागातील कोरचोली जंगलात मंगळवारी झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले होते. परंतु, चकमक स्थळाहून आज, बुधवारी सकाळी आणखी 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यामुळे चकमकीत मरणाऱ्या नक्षल्यांचा आकडा 13 झालाय. बस्तरमधील सुरक्षा दलांचे हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी नक्षलविरोधी अभियान आहे.

नक्षलवाद्यांच्या लढाऊ पथकाच्या कंपनी क्रमांक दोनसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक लाइट मशीन गन, बॅरल ग्रेनेड लाँचर आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. जवानांनी 2 महिलांसह 11 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीत अनेक कुख्यात नक्षलवादी ठार झाल्याचीही माहिती आहे. बिजापूर एसपी आणि बस्तरचे आयजी यांच्या म्हणण्यानुसार, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पीएल जीए कंपनीच्या 2 नक्षल्यांचाही समावेश आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या डीव्हीसी कमिटी सदस्य पापा राव देखील ठार झाल्याचा दावा केला जातोय. ताडमेटला येथे 6 एप्रिल 2010 रोजी झालेल्या आईडी स्फोटात त्याचा हात होता. त्या घटनेत सीआरपीएफच्या 76 जवानांना हौतात्म्य आले होते. पापा राव यांच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस आहे. तो विजापूर-सुकमाच्या सीमावर्ती भागात सक्रिय होता. दीड वर्षांपूर्वी त्यांना गांगलूर क्षेत्र समितीमध्ये पाठवण्यात आले होते.

बस्तरचे आयजीपी सुंदरराज यांनी सांगितले की, ज्या भागात चकमक झाली तेथे दहशतवादी नक्षलवादी पापा राव उपस्थित असल्याची बातमी मिळाली होती. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटल्यानंतर पापाराव यांचाही त्यात समावेश आहे की नाही, हे स्पष्ट होईल. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पापा राव यांचाही समावेश असेल, तर ते मोठे यश असेल. पापा राव हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असून बस्तरमधील प्रत्येक मोठ्या नक्षलवादी घटनेत त्याचा हात आहे. शोध मोहीम अजूनही सुरू असून ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. गेल्या 3 महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या भक्कम बालेकिल्ल्या पालनार, डुमरीपालनार, चिंतावागु, कवडगाव, मुतावेंडी, गुंडम, पुटकेल, छुटवाही या भागात सुरक्षा दलांच्या छावण्या उभारून नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत 45 नक्षलवादी ठार झाले आहेत. बिजापूरमध्ये मंगळवारी सुमारे 8 तास ही चकमक चालली. यामध्ये डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांचा सहभाग होता.