
मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ Actor Ashok Saraf यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार Maharashtra Bhushan Award जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदनही केले. मराठी चित्रपट सृष्टीत मामा या टोपणनावाने परिचित असलेल्या अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटले आहे.
सन १९६९ ते आजपर्यंत ते मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहेत आणि वयाच्या पंचहत्तरीतही प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णपणे दाखल होण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत कामाला होता. त्याचवेळी त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी नाटकांमध्ये भूमिका करणे सुरु ठेवले. अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. त्यांचे काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक अशोक सम्राट म्हणू लागले होते. नाटके, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांसह त्यांच्या अनेक टीव्ही मालिका देखील गाजल्या आहेत. अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी दोनशेवर चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच पांडू हवालदार या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला.