शरद पवार, गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार…
नागपूर : आपल्या कार्यकर्तॄत्वातून यशाचे टप्पे गाठत, लोकांना आपले व्यक्तिमत्व, कार्यकुशलता अभ्यासण्याची प्रेरणा मिळण्याइतपत कर्तबगारीची उंची वाढवण्यात यश लाभलेले बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार हे , शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे ( Sharad Pawar, Gopinath Munden, Sudhir Mungantiwar ) यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील तिसरे राजकीय नेते ठरले आहेत, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्यशैलीचा, त्यांच्या कारकीर्दीतील यशामागील गमकाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवलीय्…सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर-गडचिरोली ( Chandrapur-Gadchiroli ) ( PHD ) जिल्ह्यातील स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने उदयास आलेले आणि राज्य पातळीवर पोहोचलेले नेतृत्व आहे.
उच्च विद्याविभूषित, लोकशाहीवर प्रगाढ विश्वास, संघ विचारांचे संस्कार यातून जे रुजत गेलं, त्यातून एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या आगळ्या कंगोऱ्यांचे दर्शन सभोवतालच्या लोकांना घडू लागले. त्यांचे विचार, आचरण, कुणाच्याही मदतीला धावून जाण्याची तयारी, अन्यायाविरुद्ध लढा लढण्याची उर्मी यामुळे एका संघर्षशील नेत्याचा बाज त्यांनी अल्पावधीत निर्माण केला. केवळ निर्माणच केला नाही, तर इतकी वर्षे तो राखला देखील. लोकांचे प्रश्न मांडताना ज्या पोटतिडकीने सुधीर मुनगंटीवार मैदानात उतरतात, ज्या अभ्यासपूर्ण रीतीने ते संसदीय आयुधांचा अचूक वापर करतात, धमक दाखवून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी उच्च स्तरावर लढतात, ते बघितल्यावर समाजही त्यांच्या या शैलीची, त्यातून लाभलेल्या यशाची दखल घेऊ लागला. विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान होऊ लागला. वेगवेगळ्या मंचावरून होणारे हे सत्कार, पुरस्कार मुनगंटीवार यांनी आयुष्यात अनुसरलेल्या ध्येय धोरणांचा, तत्वाधिष्ठीत आचरणाचा, लोकमनात त्यांच्याबद्दल जागलेल्या विश्वासाचा नैसर्गिक परिणाम होता.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून झालेला गौरव हा संसदीय कारकीर्दीतला पहिला सन्मान असेल कदाचित, पण हळूहळू संसदीय कामकाजाला यश येऊ लागले. बल्लारपूरला तालुक्याचा दर्जा, नागपूर विद्यापीठाला तुकडोजी महाराजांचे नाव, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव, लहुजी साळवे मातंग समाज आयोगाची स्थापना, खनिज विकास मंत्रालयाचे गठन, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, पुण्यातील भिडे वाडीत सावित्रीबाईचे स्मारक, मूल येथे मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक, आमदार जनतेच्या दारी संकल्पनेतून त्यांनी मतदारसंघात उभारलेले फिरते जनसंपर्क कार्यालय… वनमंत्री झाल्यावर जगाने दखल घ्यावी अशा वॄक्षारोपणाचा त्यांनी राबविलेला जागतिक कीर्तीचा उपक्रम, मंत्रालयातील आपले कार्यालय आयएसओ मानांकन प्राप्त होईल अशा दर्जाचे करण्याचा यशस्वी निर्धार, आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार, अफझलखानाला मारण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखं इंग्रजांकडून मिळवून भारतात आणण्याची त्यांची घोषणा, सारंच अद्भुत आहे. एका राजकीय नेत्याची राजकारणापलीकडची नजर त्यातून स्पष्ट होते.
अशा कामांची, चौफेर यशाची दखल समाजाने घेतली नसती तरच नवल! टाईम्स ऑफ इंडिया ने यशस्वी अर्थमंत्री म्हणून एकदा नव्हे, दोनदा त्यांचा गौरव केला. उत्कृष्ट संसदपटू पासून तर, अंध कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबददल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने जी.एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षारोपण मोहिमेसंदर्भात किर्लोस्कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्थेचा कर्मवीर मासा कन्नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर, आफ्टरनून व्हॉइस या संस्थेद्वारे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर पुरस्कार, जे.सी.आय. महारष्ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार, फेम इंडिया तर्फे उत्कृष्ट मंत्री पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले, ही त्यांच्या कार्याची समाजाने घेतलेली दखलही, दैवत बोरकर यांच्या प्रबंधाचा भाग ठरली आहे. वनमंत्री म्हणून हरित महाराष्ट्र संकल्पना राबवत त्यांनी 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडाची विक्रमी मोहीम राज्यात राबविली. विक्रमी वृक्षारोपण मोहिमेची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ तसेच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तर्फे घेतली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात या वृक्षारोपण मोहिमेचे कौतुक केले. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका प्रसिध्द करणारे ते मंत्री ठरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयातील एक शिक्षक दैवत बोरकर यांनी नुकतीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, कार्यशैलीवर पीएचडी मिळवली आहे. राजकीय क्षेत्रात वावरताना राजकारणाचा गंधही व्यक्तिमत्त्वाला लागू न देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार नामक एका प्रभावी नेत्याच्या तितक्याच प्रभावी कारकीर्दीचा सुमारे चार वर्षे केलेला अभ्यास, अवलोकन, निरीक्षण, वाचन, सान्निध्य…याचा एकत्रित परिणाम म्हणजे दैवत बोरकर यांनी पीएचडी साठी साकारलेला प्रबंध आहे.
या राज्यात शेकडो राजकीय नेते आहेत. वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. पण ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्यशैलीचा इतरांनी अभ्यास करावा, ज्यावर प्रबंध लिहिला जावा आणि तो प्रबंध डॉक्टरेट पदवीसाठी पात्र ठरावा, असे कालपर्यंत फक्त शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीतच घडले होते. या श्रेणीत आता सुधीर मुनगंटीवार यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांच्या आजवरच्या यशाच्या शिरपेचात हा यश आणि मानाचा नवा तुरा ठरला आहे….