नागपूरः विधिमंडळ अधिवेशनाच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च होता. सर्वच गोष्टींची जय्यत तयारी केली जाते. मात्र, तरीही अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसी विधानसभेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने (Power Failure in Legislative Assembly) सभागृहाचे कामकाज सुमारे ५० मिनिटे तहकूब राहिले. हे सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रकारावर केली. तर वीज केल्यामुळे कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाता प्रत्यक्ष अनुभवता आले, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.
रोहित पवार म्हणाले की, खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडले. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटा मिनिटाला विजेसाठी झुंजावं लागते. यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. तर अजित पवार म्हणाले की, विधीमंडळाच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. विधीमंडळ सदस्य आपला अमूल्य वेळ कामकाजासाठी देत असतात. राज्यातील जनतेचे लक्ष कामकाजाकडे लागलेले असते. कामकाजातील प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. विधीमंडळाचा वेळ वाया जावू नये म्हणून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडल्याने सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे योग्य नाही. ज्या यंत्रणेवर ही जबाबदारी आहे ती यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा वारंवार बंद पडणे आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे, हे सरकारचेही अपयश असून मी या प्रकाराचा निषेध करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला.