
चंद्रपूर – शहरातील घनदाट भागात अस्वलीच्या हल्ल्यानंतर वनविभाग सतर्क झालाय. वनविभागाच्या बचाव चमुने आज या परिसराची पाहणी केली. ज्या जंगल भागातून अस्वलीने प्रवेश केल्याची शंका आहे त्या भागात कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत. चंद्रपूर शहराच्या घनदाट लोकवस्तीच्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलीचा धुमाकूळ बघायला मिळाला होता. लालपेठ भागातील जंगल परिसराला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅक भागातून अस्वलीने या भागात प्रवेश केला. अचानक पुढ्यात आलेल्या अस्वलीमुळे नागरिकांमध्ये एकच धावाधाव झाली.
अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर एका चिकन शॉप मध्ये पळापळ करत शिरलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत शटर बंद केल्याने हल्ल्यातून नागरिक बचावले. लालपेठ कोळसा खाणीच्या क्षेत्रातून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागच्या जंगलात या अश्विनीने प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे त्यामुळेच आज सकाळपासून या भागात वनविभागाची चमू गस्त घालत आहे. घनदाट लोकवस्तीत शिरलेल्या अस्वलीमुळे मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
घनदाट जंगल व लोकवस्तीच्या मधून गेलेला रेल्वे मार्ग व त्यालगत असलेले अस्वलीच्या आवडते खाद्य बोराची झाडे असल्यामुळे या भागात अस्वल आकर्षित होते असे वनविभागाचे मत आहे. या भागात असलेल्या खाजगी व शासकीय जमिनीवरील झुडपी जंगलामुळे अस्वलीला आश्रयस्थान मिळत आहे. या परिसराची स्वच्छता झाल्यास हा उपद्रव कमी होईल असा वनविभागाचा कयास आहे