
चंद्रपूर(Chandrapur), दिनांक:२२ मार्च २०२६
समाजाप्रती कर्तव्यभावना, समर्पण आणि संस्कार यांची सांगड घालत भागवत चेंबर्सतर्फे वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने आयोजित ‘निधी समर्पण सोहळा’ उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. गेल्या अकरा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून, “आपण समाजाचे देणे लागतो” ही जाणीव प्रत्येकाच्या मनात जागृत करणारा हा सोहळा ठरला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ महिला अधिवक्ता ॲड. संध्या मुसळे व ॲड. राजू सागोरे उपस्थित होते. मंचावर ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रवींद्र मधुकरराव भागवत, सौ. माधवी रवींद्र भागवत (अध्यक्ष, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर प्रतिष्ठान) तसेच नितांत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य श्री. राजेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन ॲड. प्रशांत ठाकूर यांनी तर प्रास्ताविक ॲड. अभय पाचपोर यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. आकाश गिरी यांनी मानले.
या सोहळ्याची संकल्पना २०१४ मध्ये मांडण्यात आली आणि २०१५ पासून तिची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. आज अकरा वर्षांनंतरही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. भागवत चेंबर्समधील आजी-माजी अधिवक्त्यांनी एकत्र येत समाजातील सेवाभावी संस्थांसाठी दरवर्षी निधी उभारण्याचा हा उपक्रम समाजातील सहकार्य आणि समर्पणाचा उत्कृष्ट आदर्श ठरला आहे.
यंदा हा निधी जिवती तालुक्यातील दुर्गम भागात कार्यरत ‘नितांत बहुउद्देशीय शिक्षण संस्था’ यांना समर्पित करण्यात आला. या संस्थेने ‘माउंट इंग्लिश स्कूल’च्या माध्यमातून आदिवासी, बंजारा व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून काही शिक्षक म्हणूनही समाजसेवा करत आहेत.
या प्रसंगी ॲड. संध्या मुसळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दुर्गम भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या संस्थेचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. तसेच भागवत चेंबर्सचा उपक्रम समाजात समर्पणाची भावना निर्माण करणारा आणि दिशा देणारा आहे.
ॲड. राजू सागोरे यांनी ॲड. भागवत यांना “विधीक्षेत्रातील वटवृक्ष” असे संबोधत त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या ज्ञानाचा उल्लेख केला. त्यांनी त्यांच्या साधेपणाचे आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे विशेष कौतुक केले.
आपल्या मनोगतात ॲड. रवींद्र भागवत यांनी भागवत चेंबरला “एक कुटुंब” संबोधत “वसुधैव कुटुंबकम्” या विचाराची प्रचिती दिली. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’मधील ओळींचा उल्लेख करत समर्पणाचा गाभा स्पष्ट केला—
“जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात”
या ओळींचा भावार्थ मांडताना त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, हीच खरी संस्कृती आहे.
त्यांनी ‘संस्कृती, प्रकृती आणि विकृती’ यांचा उल्लेख करत स्पष्ट केले की,
- विकृती म्हणजे इतरांचे हक्क हिरावून घेण्याची वृत्ती,
- प्रकृती म्हणजे प्रत्येकाने आपलेच पाहणे,
- तर संस्कृती म्हणजे “मला मिळालेल्यातून इतरांना काय देता येईल” हा विचार.
याच संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी आपल्या ज्युनिअर्सना केले.
विशेष म्हणजे, कोरोनाकाळातही या उपक्रमात खंड पडला नाही. त्या कठीण काळातही भागवत चेंबर्सने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाखांहून अधिक रक्कम दिली होती, ही समाजनिष्ठेची जिवंत साक्ष आहे.
श्री. राजेश राठोड यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याची माहिती देत भागवत चेंबर्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे समाजातील सेवाभावी संस्थांना मोठा आधार मिळतो, असे नमूद केले. तसेच ते पुढे म्हणाले की ,समाजाला दिशा देणारा हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो एक संस्कार आहे—समर्पणाचा, सहकार्याचा आणि समाजाशी नातं जपण्याचा. “सामूहिक प्रयत्नातून मोठी उद्दिष्टे सहज साध्य होतात” हा संदेश देत भागवत चेंबर्सची ही परंपरा पुढील काळातही अशीच तेजोमय राहो, हीच अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भागवत चेंबर्समधील आजी-माजी अधिवक्ता, न्यायाधीश तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी ज्युनिअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.















