
(Nagpur)नागपूर : मकरसंक्रात जवळ आली आहे. पतंगबाज सज्ज होत आहेत. एकीकडे नागपूर महानगरपालिकाच्या वतीने नुकतीच नायलॉन मांजामुक्त नागपूर अशी प्रतिज्ञा सर्वसामान्यांना देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कितीजण नायलॉन मांजापासून दूर जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नागपुरात 14 जानेवारी आणि 26 जानेवारी असे दोन तीन दिवस पतंग उडविण्याची धूम असते.
शनिवार,रविवारी काही जण ओ काट… ओ पार… असे पतंगोत्सवात गुंतलेले असतात. आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाला मांजासोबतच पतंगांची तेवढीच मोठी मागणी असते. त्यामुळे पतंग बनविणा-यांची लगबग सुरु असून विविध रंगांचे आकाराचे पतंग बनविण्यात कारागीर मग्न आहेत. खरेतर एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनविण्यास सुरुवात केली जाते. पतंगामध्ये विविध आकार सुद्धा असून यात अर्धीचा, कटपाऊण, पाऊणचा ,सव्वाचा, अण्णाठोल असे लहानपासून तो मोठा आकारापर्यंत पतंग देखील कारागीर तयार करत आहेत.
शहरात बाटा कंपनीमागे इतवारी, जुनी शुक्रवारी पतंगबाजासाठी मोठे मार्केट आहे. कालानुरूप अनेक प्रकारचे पतंग या ठिकाणी बनविले जातात.