
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग १ |
कुठलाही देश किंवा राष्ट्र स्वतंत्र झाल्यावर त्या देशावरच्या परकीय आक्रमणाच्या व पारतंत्र्याच्या खुणा पुसून काढल्या पाहिजे. जोपर्यंत एखाद्या रेल्वे स्थानकाचे नाव विकटोरिया टर्मिनस असते तो पर्यंत परकीय शासकांचे स्मरण स्वाभाविकपणे होत राहाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हटले की भाव बदलतो. महाराजांच्या नावाच्या साध्या उच्चारणाने देशभक्तीचा भाव जागतो.
राम हा तर भारताचा श्वास. रामायण म्हणजे भारतीय भावभावनांची भागीरथी. राम कथा हे महर्षी वाल्मीकींनी लिहिलेले केवळ काव्य नसून तो तर ‘अमृत संचय’ आहे.
आम्ही एकमेकांना भेटलो की ‘राम राम’ म्हणतो. जीवनातील स्वारस्य संपले की जीवनात ‘राम’ उरला नाही, असे म्हणतो. अखेरच्या क्षणालाही ‘रामनाम सत्य है’ घोषानेच अखेरचा निरोप दिला जातो. बाबराने श्रीरामजन्मभूमी मंदिर का तोडले ? भारताच्या अस्मितेवर घाला घालण्याचा त्याचा मानस होता. हिंदूंच्या जीवनातील ‘राम’ घालवल्याशिवाय इथे राज्य करणे सोपे नाही, याची बाबराला खात्री होती. जगात आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ असण्याचे कारण ‘ जियो और जिने दो’ हा या मातीचा विचार आहे.ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः, हा या मातीचा स्थायीभाव आहे. भारत सोडला तर बाहेरच्या देशांचा विचार ‘हम ही जिएंगे’ आहे. आम्ही कधी तलवारीच्या धाकावर आपला विचार थोपवला नाही. बाबर, गजनवी, औरंगजेब हे तलवारीच्या धाकावर आपला विचार थोपवणाऱ्या परकीय मानसिकतेचे आक्रमक होते. म्हणूनच श्रीरामजन्मभूमीवर ताबा मिळवून बाबराने केलेले बांधकाम हा आपल्या संस्कृतीवरचा कलंक होता. देश स्वतंत्र झाल्यावर पहिले कणखर गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. दुर्दैवाने तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी श्रीरामजन्मभूमी, काशी विश्वेश्वर आणि श्रीकृष्णजन्मभूमी संदर्भात निर्णय केला नाही. व्होट बँकेच्या स्वार्थापोटी त्यांनी राष्ट्रीय अस्मितेवरचा लागलेला कलंक जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला. नंतर त्यांच्या राजकीय वारसदारांनी केवळ तीच भूमिका ठेवली असे नाही तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धांना पायदळी तुडवण्याचे काम केले. आमचा संघर्षाचा इतिहास जगासमोर येऊ दिला नाही.
श्रीरामजन्मभूमी मुक्तिसाठी ७६ लढाया !
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामजन्मभूमी मंदिर सहजासहजी मोगलांच्या ताब्यात गेले नाही. त्यासाठी लक्षावधी हिंदूंचे रक्त सांडले. १५२६ मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह याने बाबराचा लढाईत पराभव केला. पराभूत झालेल्या बाबराची पापी नजर अयोध्येतील रामजन्मभूमीवर हितीच. बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणासंगावर आक्रमण केले. या युध्दात बाबर विजयी झाला. बाबराने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर रामजन्मभूमी वरील राममंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्याची जबाबदारी सोपवली.
राममंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते. किती तरी महिने हा संघर्ष चालूच होता. मुसलमानांची सेना जवळजवळ पावणे दोन लक्ष व तोफखान्याने सज्ज होती. इतिहासकारांच्या नोंदी नुसार सुमारे १ लक्ष ७१ हजार हिंदू वीरांनी बलिदान केले. अखेर २३ मार्च १५२८ ला मीर बाकीने अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त केले.
रामभक्त शांत बसले नाहीत. हिंदुंनी परत एकदा लढा उभा केला. या लढ्याचे नेतृत्व सनेथी गावचे थोर रामभक्त पं. देवीदीन पांडे यांच्याकडे आले. पांडेजींनी ७० हजाराची फौज उभी केली. खुद्द बाबराच्या नोंदीनुसार एकट्या देवीदीनने ७०० परकीय योद्धे ठार मारले. पाच दिवस तुंबळ युद्ध झाले. अखेर देवीदीन पांडे या लढ्यात मारले गेले. त्यानंतर हँसवर रियासतीची राणी जयराजकुमारी हिने तीन हजार वीरांगनांची एक पलटणच उभी केली. राणीने सुमारे १० मोठ्या चढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली.
नंतर आला हिंदू संस्कृतीचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब! औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या रक्षणासाठी ५० हजारांची फौज पाठवली. बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणझुंजार गुरु गोविंदसिंग यांना मदतीसाठी निरोप धाडला. ते तडक अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेची लांडगेतोड केली. संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला. सततच्या लढयांनी हिंदू थकले होते. शिवाय शाही फौज शस्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती. औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी १० हजार शहीद झालेल्या हिंदुंच्या मृतदेहांवरून !बाबराच्या सेनापती मीर बाकीने २ लढाया करून, मंदिर अर्धेमुर्धे पाडून, जी काही अर्धवट मशीद बांधली, त्या नंतर खुद्द बाबराच्या काळातच ४ लढाया झाल्या. हुमायूँमच्या काळात १०, अकबराच्या काळात २०, औरंगजेबाच्या काळात ३०, नवाब सआदत अलीच्या काळात ५, नवाब नसिरुद्दीनच्या काळात ३, नवाब वाजीद अली शाहच्या काळात २. अशा १९३४ पर्यंत एकूण ७६ लढाया हिंदू रामजन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले.त्यात ४ लक्ष हिंदुंचे बलिदान झाले. हे बलिदान फार मोठे होते. म्हणूनच श्रीरामजन्मभूमी मुक्ती अभियानात महत्वाची प्रेरणादायी घोषणा होती, अयोध्या के शहिदो को, भूलो मत ! भूलो मत !
(क्रमशः)
शिवराय कुळकर्णी
9881717827
——————————————
#rammandir #hindu #ram #bjp #ayodhya #hinduism #india #narendramodi #jaishreeram #rss #hindutva #modi #jaishriram #hindustan #sanatandharma #kattarhindu #yogiadityanath #bajrangdal #bharat #bhagwa #mahadev #hindurashtra #hanuman #yogi #vhp #kattar #harharmahadev #namo #shiva #ayodhyarammandir