भंडारा-गोंदिया लोकसभा : भाजपाचे मेंढे- कॉंग्रेसचे पडोळे कोण जिंकणार ?  

0

नागपूर (-शंखनाद चमू)

कधीकाळी कॉंग्रेसचा गड असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नंतरच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता भाजपचे वर्चस्व आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा प्रफुल्ल पटेल यांचा गृह मतदारसंघ यावेळी चर्चेत आहे. पटोले यांनी ऐनवेळी या लढाईत उमेदवार म्हणून माघार घेतल्याने भाजपविरुद्ध कॉंग्रेसला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे भाजपातही उमेदवार बदलाच्या मागणीमुळे नाराजी आहे त्याचा फटका बसू शकतो. १९९९ मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर ताबा मिळविला, पुढे जम बसविला. भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यावरच विश्वास दाखविला असून कॉंग्रेसकडून नाना पटोले यांनी माघार घेत नवख्या डॉ. प्रशांतसापडोळे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे दिवंगत सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव आहे. बसपा, वंचितचा काही भागातील प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशीच सरळ होणार आहे.