उद्या पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात मतदान

0

उद्या पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात मतदान

निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचारी ईव्हीएम रवाना

नागपूर – पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात उद्या शुक्रवारी 19 एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. नागपुरातील सिव्हिल लाईन्सस्थित सेंट उरसुला महाविद्यालयातून नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात पोलिंग पार्टी निवडणूक अधिकारी, कर्मचारी उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय घेणाऱ्या ईव्हीएमसह आज दुपारी रवाना झाले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने सलग सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पर्यटन, देवदर्शनासाठी जाऊ नका,आधी मतदान करा असे आवाहन विविध राजकीय पक्ष ,जिल्हा प्रशासनाने केले असून नागपूरकर त्याला कितपत साथ देणार हे उद्याच कळणार आहे. गेल्यावेळी नागपुरात 54 टक्के मतदान झाले आता मिशन डीस्टिकशन अर्थात किमान 75 टक्के मतदान व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले आहे. काल रामनवमी निमित्ताने धार्मिक कार्यक्रम,शोभायात्रांच्या निमित्ताने सत्तारूढ- विरोधक परस्परांसोबत एकत्रित पाहायला मिळाले. आता अर्थातच मतदार स्थिर सरकार, विकासासाठी पुन्हा मोदी सरकारला कौल देणार की मूलभूत प्रश्नी नाराजीतून परिवर्तन घडविणार हे येत्या 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे. राज्यात एकंदर पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार असून नागपूर,रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा पाच महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. नागपूर, गडचिरोली ,भंडारा या तीन मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नितीन गडकरी, अशोक नेते आणि सुनील मेंढे यांना मैदानात उतरवले असून चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तर रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत रिंगणात उतरलेले राजू पारवे यांची कसोटी लागणार आहे. नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर, रामटेकमध्ये श्याम कुमार बर्वे,गडचिरोलीत नामदेव किरसान आणि भंडारा मतदारसंघात डॉ प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. रामटेक मध्येमध्ये अपक्ष किशोर गजभिये यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः या मतदारसंघात तळ ठोकावा लागला यावरून ही लढत भाजप- सेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान तर भंडारा -गोंदिया मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ प्रशांत पडोळे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. गेल्यावेळी काँग्रेसला धक्का देणाऱ्या बसपा आणि वंचितचा प्रभाव यावेळी कायम राहणार की भाजप काँग्रेस अशी थेट लढत होणार हे मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.