गडचिरोली-चिमूर लोकसभा : भाजपचे नेते जिंकणार की काँग्रेसचे किरसान यांना संधी !

0

नागपूर -(शंखनाद चमू)

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांमध्ये ‘वन टू वन’ फाईट होत आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आणि चिमूर, तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते हे खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांना ५ लाख १९ हजार ९६८ मते मिळालीत. काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांचा त्यांनी ७७ हजार ५२६ मतांनी पराभव केला. त्यावेळी डॉ.उसेंडी यांनी ४ लाख ४२ हजार ४४२ मते घेतली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.रमेशकुमार गजबे यांनी १ लाख ११ हजार ४६८ मते घेतली होती. यासोबतच बसपाचे हरिश्चंद्र मंगाम यांनी २८ हजार १०४, तर आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना १६ हजार ११७ मते मिळाली. २४ हजार ५९९ मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती दिली.

यावेळी पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेले अशोक नेते हॅट्ट्रिक करणार की मतदार काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांच्या निमित्ताने परिवर्तन घडविणार हे 4 जून रोजी उघड होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही तिकिटासाठी आपले वजन खर्ची घातले. परंतु भाजपपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. गेल्यावेळी नेते यांना चांगली लढत देणारे माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी आदिवासी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश घेतल्याने काँग्रेसचे कितपत नुकसान होणार यावर नेते यांच्या विजयाचे गणित आहे. कारण उसेंडी यांच्या तुलनेत सक्षम असलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी गेले अनेक दिवस हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. आता गेल्यावेळी लक्षणीय मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीतर्फे रिंगणात असलेले हितेश मडावी आणि बसपाचे उमेदवार योगेश गोन्नाडे यांच्या मतविभाजनावर भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान या दोघांमधील थेट लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.