गडकरी, मुनगंटीवारांसह महत्त्वाच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

0

महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर

नागपूर -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय महामार्ग मंत्री, भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांना तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते,राज्य मंत्रिमंडळातील वन ,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार यांच्यासोबतच राज्यातील ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी लोकसभा लढण्याची संधी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपच्या दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव आले आहे. यासोबतच विदर्भातील प्रतिष्ठेच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने प्रथमच संधी दिली आहे.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी 1989,1991 साली लोकसभा निवडणूक लढविली मात्र पराभव स्वीकारावा लागला. 1995 मध्ये ते चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी जिंकले व युती शासनात पर्यटन मंत्री झाले. यानंतर निष्ठावान मुनगंटीवार सतत विधानसभेत निवडून आले व त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीसह पुढेही विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. 2010 साली भाजपने मुनगंटीवार यांना प्रदेशाध्यक्ष म्हणूनही संधी दिली ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते,माजी खासदार व केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासाठी हा धक्का म्हणता येईल. पक्षादेश मान्य राहील मात्र,आपली लोकसभा लढण्याची इच्छा नाही असे स्पष्ट करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी गेले सहा महिने विविध कार्यक्रमांचा धडाका लावला होता हे विशेष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध प्रकल्पांचे उदघाटन मंगळवारी पार पडले. विदर्भातील इतर मतदारसंघाचा विचार करता अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुभव धोत्रे यांना भाजपने लोकसभेची संधी दिली. दरम्यान, वर्धा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास टाकला आहे. गेले अनेक दिवस या मतदारसंघात उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा जोरात होत्या. पर्याय म्हणून मोठमोठ्या नेत्यांची नावे घेतली जात होती. मात्र पक्षाने तडस यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. आज जाहीर झालेल्या 72 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपच्या 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालना तर पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. महायुती संदर्भात दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय होताच इतर मतदारसंघातही उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आनंदोत्सव धंतोलीस्थित भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर रात्री साजरा करण्यात आला.

1. नंदुरबार – हिना गावित

2. धुळे – सुभाष भामरे

3. जळगाव – स्मिता वाघ

4. रावेर रक्षा खडसे

5. अकोला – अनुप धोत्रे

6. वर्धा – रामदास तडस

7. नागपूर – नितीन गडकरी

8. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार

9. नांदेड – प्रतापराव चिखलीकर

10 जालना – रावसाहेब दानवे

11 दिंडोरी भारती पवार

12 भिवंडी-कपिल पाटील

13 मुंबई उत्तर – पियुष गोयल

14 मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा

15 पुणे- मुरलीधर मोहळ

16 अहमदनगर सुजय विखे पाटील

17 लातूर सुधाकर सुंगारे

18 बीड – पंकजा मुंडे

19 माढा रणजित नाईक निंबाळकर

20. सांगली – संजय काका पाटील