
विदर्भ साहित्य संघ निवडणूक
अक्षरमैत्री पॅनलचा आरोप
नागपूर (Nagpur):-
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतील मतदानाची शेवटची मुदत आणि मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतशी या निवडणुकीतली राजकीय रंगत आता आकार घेते आहे. यापूर्वी साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तीने या निवडणुकीच्या मैदानात उडी घेण्याचा मुद्दा बराच गाजत असताना, आता भारतीय जनता पक्ष, विशेषतः भाजपाचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी या निवडणुकीत गिरीश गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला प्रत्यक्षपणे मदत चालवली असल्याचा आरोप या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या अक्षरमैत्री पॅनलच्या नेत्यांनी केला आहे.
अक्षर मैत्री पॅनलचे डॉ. पिनाक दंदे, विलास मानेकर आणि अध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप दाते यांनी येथे जारी केलेल्या एका जाहीर निवेदनातून यासंबंधीची चर्चा उद्धृत केली आहे. या तिघांच्याही स्वाक्षरीने जारी झालेल्या या निवेदनात, भाजपा या निवडणुकीत उघडपणे गिरीश गांधी यांची बाजू घेत विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत राजकारण आणत असल्याचा आणि डॉ. उपेंद्र कोठेकर हे तर गिरीश गांधी यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखाचीच भूमिका पार पडीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शतकाहून अधिक काळाची परंपरा व इतिहास लाभलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या एकूणच कारभारात आणि सध्याच्या निवडणुकीत, विविध राजकीय व अन्य विचारधारा मानणारी मंडळी कार्यरत आहे. हे सारेच लोक राजकीय पक्ष व विचारांच्या चौकटी बाजूला ठेवून या निवडणुकीच्या मैदानात एकमेकांचा आदर करीत उतरले आहेत. या परिस्थितीत भाजपाने सरळ सरळ एका उमेदवाराची बाजू घेणे कितपत योग्य आहे असा सवालही डॉ. पिनाक दंदे, विलास मानेकर व प्रदीप दाते यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी गिरीश गांधी यांच्या उमेदवारी संदर्भात, त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पाठबळ लाभले असल्याची चर्चा केली जात होती. त्यावर स्वतः नितीन गडकरी यांनी एक निवेदन जाहीर करून आपला या निवडणुकीशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना, आता भाजपाच्या संघटन स्तरावर या निवडणुकीत गिरीश गांधी यांना मदत व्हावी अशा रीतीने कार्य केले जात असल्याचा, मतदारांकडून मतपत्रिका संकलित केल्या जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. शिवाय, साहित्यबाह्य राजकीय क्षेत्रातील मंडळींनी अशा रीतीने एखाद्या साहित्य क्षेत्रातील संस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे मतही या पत्रकातून व्यक्त करण्यात आले आहे.

आरोप खोटा: डॉ. उपेंद्र कोठेकर
अक्षर मैत्री पॅनलच्या वतीने जारी करण्यात आलेल्या जाहीर निवेदनातून करण्यात आलेले आरोप केवळ गैरसमजातून झालेले असून, भारतीय जनता पक्ष म्हणून या निवडणुकीत कुठलीही राजकीय भूमिका वठवली जात नसल्याचे स्पष्ट मत भाजपाचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीशी या संदर्भात बोलताना डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, मुळातच, शतकाची परंपरा लाभलेल्या या संस्थेत निवडणुकीची वेळच येऊ नये असा प्रयत्न एक साहित्यरसिक म्हणून आपण केला होता. दुर्दैवाने त्याला यश आले नाही व निवडणुकीची वेळ आली. या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जवळपास सर्वच पॅनल मधील अनेकांशी आपली मैत्री व ओळख आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष म्हणून कुठलीही भूमिका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अक्षर मैत्री पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याशा गैरसमजातून माझ्यावर हा आरोप केला असावा, असे वाटते. मी कोणाचाही निवडणूक पदाधिकारी असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असेही कोठेकर यांनी स्पष्ट केले आहे.














