नागपूर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) भारत देशाच्या परिवर्तनाचे एक अभियान आहे, ज्याद्वारे सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात केले.
भारत राष्ट्र समितीचा कार्यकर्ता मेळावा कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी
शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यावेळी पक्ष प्रवेश केला.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, मी अनेक बुद्धिजीवींना विचारतो आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे ? पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. निवडणुका जिंकणे हेच जणू भारताचे लक्ष्य झाले आहे. परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा विजय व्हायला हवा, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन देखील अजूनही लोकांना मुबलक पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत ही अत्यंत शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे, परिवर्तित भारतच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे. दलित व आदिवासी समाजाची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत सुदृढ व सशक्त समाजाची निर्मिती होणार नाही. भारतात दरवर्षी १,४०,००० टीएमसी पाऊस पडतो. बाष्पीभवन आणि भूमीत शोषल्या नंतर देखील जवळपास ६०,००० टीएमसी पाणी आपल्या नद्यांमधून वाहते. तरी आपल्या जनतेला पाणी मिळत नाही. आपण जर या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तरी देखील १५-२० हजार टीएमसी पाणी उरेल.
वीजेची देखील तीच समस्या आहे. ३६१ बिलियन टन कोळसा साठा भारतात आढळून आला आहे. याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास १५० वर्षे पर्यंत भारताला पुरेल एवढी ऊर्जानिर्मिती होऊ शकते. पण तरीही आज आपल्याला २४ तास वीज मिळत नाही, याचे कारण काय ?
तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना २४ तास मोफत पाणी व वीज पुरवतो. आम्ही तहसील मध्ये तलाठी व्यवस्था समाप्त केली आणि सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सर्व नागरिकांना मिळण्याची व्यवस्था केली आहे. धान उत्पादनामध्ये तेलंगणा राज्याने देशात विक्रमी उत्पन्न घेतले. महाराष्ट्रात जर ही पद्धती जर लागू झाली तर नेत्यांचे दिवाळे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत व माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना नांदेड येथे भेटलो असता ते म्हणाले की तुमचे इथे काय काम ? तर मी त्यांना म्हणालो तुम्ही तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रामध्ये लागू करा मी मध्य प्रदेशला जातो. योग्य दिशेने आणि योग्य तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे शक्य आहे.
प्रदेश समिती अध्यक्ष माणिकराव कदम यांनी स्वागतपर भाषण केले. माजी आमदार चरणसिंग वाघमारे म्हणाले की, तेलंगणा विकासाचे मॉडेल मुळातून समजून घेतल्यावर ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
चंद्रशेखर राव यांचे तत्पूर्वी हैदराबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे प्रवक्ता के.के., माजी खासदार बी. बी. पाटील, आमदार बलका सुमन, माजी आमदार राजू तोडसाम, राज्यसभेचे माजी खासदार संतोष राव, माजी आमदार चरण वाघमारे, पूर्वविदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, माजी खासदार .हरीभाउ राठोड, माणिक कदम, माजी आमदार दीपक आत्राम ,आ.राजू तोडसाम, वसंतरावजी बोंडे, पवन तिजारे , मुरलीधर भरै ,निखिल देशमु,नागेश्वर घोडाम,प्रविण शिंदे,आ.जग्गुरामन्ना, आ.कोनेरु कोणप्पा,विठ्ठलराव दंडे,आ.बालका सुमन,आ.जीवन रेड्डी,श्रवणकुमार रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार आनंदराव गेडाम, संजय बोरकर मनीष नांदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.