Buldana Travels bus driver drunk drive forensic report
बुलढाणा, ७ जुलै : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी अधिक तपासात विदर्भ ट्रॅव्हल्सचा बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवालातून समोर आले आहे.
समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या मध्यरात्री भीषण बस अपघात झाला होता. या प्रकरणी चालक दानिश इस्माईल शेखच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यात प्रमाणापेक्षा अधिक अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (अमरावती) रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, शेख दानिशच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्क्यांपेक्षा जास्त होते. सदर अपघाताप्रकरणी बस चालकाविरोधात याआधीच भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानिशच्या रक्ताच्या अहवालामुळे त्याला पुढे दोषी ठरवले जाऊ शकते. यासाठी त्याला १० वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
अल्कोहोलचे सामान्य प्रमाण
महाराष्ट्रात रक्तात अल्कोहोलचे मान्य प्रमाण १०० मिलिलीटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र प्राप्त अहवालानुसार दानिशच्या रक्तात त्यादिवशी ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे, तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या चालकाच्या मद्यपानामुळे घडला होता का, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी दिलेल्या माहितीनुसार, २३ मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत. डिझेलमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यामुळे २५ बळींना बचावण्याची संधीच मिळाली नाही. फॉरेन्सिक अहवालात टायर फुटल्यामुळे अपघात झाला का याची शक्यताही तपासण्यात आली. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण, निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.
असा घडला अपघात
विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता ही बस पुण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. रात्री १.२२ मिनिटांनी पिंपळखुटा गावाजवळ धावती बस दुभाजकाला धडकली. धडकेनंतर बस पलटली आणि डिझेल टाकीचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण बसने पेट घेतला. काही कळायच्या आता बस पेटल्याने अनेकांना त्यातून बाहेर पडता आले नाही. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.